कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी येथे आठ दिवसांपासून चिकनगुनिया सदृश आजाराने थैमान घालत आहे. चिकनगुनिया साथीचे सत्तरहून अधिक रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कोळेवाडी आणि शिंदेवाडी येथे आठ दिवसांपासून चिकनगुनियासदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ताप आणि सांधेदुखीचा त्रास होत असल्याचे बाधितांची मोठी वाताहत होत आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक लोकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली आहे. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बाधितांचा आकडा कमी असला तरी सध्या रुग्णांची संख्या सत्तर पार झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी चिकनगुनियासदृश रुग्ण सापडल्यापासून कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशासेविका यांच्यामार्फत गावामध्ये सर्वेक्षण केले जात आहे. कोळेवाडी येथे अनेक दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने कोरोनाच्या भीतीने चिकनगुनियासदृश लक्षण असतानाही लोकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते आहेत. परिणामी दिवसेंदिवस बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.
चौकट :
कोळेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवाडीचाही समावेश होतो. ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा आणि नाल्यांची साफसफाई होत असली तरी कोळेवाडी मूळ वसाहत नैसर्गिक असलेल्या ओढ्याकाठी वसली असल्याने या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी ओढ्यातील पाणी प्रवाहाला अडथळे निर्माण होत असल्याने घाणीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मच्छर, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अतिक्रमणामुळे ओढ्याला मोठे पाणी आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदेवाडीचीही हीच परिस्थिती आहे.
चौकट :
प्राथमीक आरोग्य केंद्राच्यावतीने गावातील साठवण पाण्याच्या भांड्यांचे सर्वेक्षण करून पाणी खाली करण्यात आले आहे. मात्र अनेकांच्या घरात, परसबागेत वापरात नसलेल्या साठवण पाण्याची भांडी रिकामी करणे गरजेचे आहे.
चौकट :
कोळेवाडी येथे चिकनगुनिया सदृश लक्षण असलेले बाधित रुग्ण सापडले आहेत. ३५ रुग्णांवर तपासात आढळले आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक बाधित खरी माहिती देत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने निश्चित आकडा सांगता येत नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही काही बाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परिणामी चिकनगुनियासदृशच बाधित रुग्ण असून पुढील तपासणीसाठी पुणे येथे नमुने पाठविण्यात आले आहेत.
- सुप्रिया बनकर,
वैद्यकीय अधिकारी, कोळे