लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने उभ्या राहिल्याचे चित्र आहे. महिलांसाठी ३ हजार ६३३ जागा राखीव असल्या तरी, तब्बल ४ हजार ६४५ महिला या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली आहे. सातारा तालुक्यातील १३०, कऱ्हाडातील १०४, पाटणमधील १०७, कोरेगावातील ५६, वाईमधील ७६, खंडाळ्यातील ५७, महाबळेश्वरमधील ४२, फलटणमधील ८०, जावलीतील ७५, माणमधील ६१, खटावातील ९० ग्रामपंचातींची निवडणूक होत आहे. त्यापैकी १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत, तर ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत आता प्रत्यक्षपणे ९ हजार ५२१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत ७ हजार २६६ सदस्य निवडले जाणार आहेत. यापैकी ३ हजार ६३३ महिला निवडून द्यायच्या आहेत. निवडणूक लागलेल्या गावांमध्ये महिला एकत्रितपणे प्रचाराला फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराचे मुद्दे देखील एकमेकांवर टीकेपेक्षा गावाच्या विकासाच्या अनुषंगाने आहेत.
सातारा तालुक्यात सर्वाधिक महिला
सातारा तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या या तालुक्यात आहे. या तालुक्यात महिलांसाठी ५२४ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. त्यासाठी १०२५ महिला उमेदवार उभ्या राहिल्या आहेत. तालुक्यात महिलांची संख्या जास्त असल्याने निवडणुकीमध्ये महिलाराज पाहायला मिळते. सध्या तरी भाजपचे प्राबल्य या तालुक्यात पाहायला मिळते.
महिलांसाठी आरक्षित ३६३३ जागा
जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींमध्ये ७ हजार २६६ सदस्य निवडले जाणार आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांसाठी ३ हजार ६३३ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. विविध जात प्रवर्गांसाठी राखीव असलेल्या जागांवर देखील महिला उमेदवार मिळाले नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे एका जागेसाठी तीन महिला उभ्या असल्याचेही पाहायला मिळते.