सातारा: जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या कोरोना चाचणी यंत्रामध्ये बिघाड झाल्यानंतर कोरोना चाचणीचे अहवाल सरसकट पॉझिटिव्ह येऊ लागले. मात्र हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ टळला. बिघाड झालेल्या यंत्रातून आलेले अहवाल खातरजमा करण्यासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. मात्र हे अहवाल प्रशासनाने जाहीर न केल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅब तांत्रिक बिघाडामुळे सध्या बंद आहे. त्यामुळे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे, मुंबईला पाठवावे लागत आहेत. त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे स्वॅब रिपोर्ट पेंडिंग पडले असून कोरोना चाचणीचे अहवाल मिळण्यास उशीर होत आहे.
जिल्ह्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी होते. रॅट चाचणी निगेटिव्ह आलेल्यांची कोरोना पॉझिटिव्हिटी तपासण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे बाधितावर कोरोनाचे उपचार सुरू करता येतात. पूर्वी तशी सुविधा नसल्याने लक्षणे असलेल्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात होते. त्यामुळे अहवाल समजण्याला उशीर होत होता.
जिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्यानंतर जास्त भार नसल्यास एका दिवसात अहवाल मिळू लागले. तपासणीच्या संख्या जास्त असल्यास काही वेळेला कोरोनाचा अहवाल मिळायला दोन दिवस लागत होते. पूर्वी चाचणी केल्यानंतर अहवाल घेण्यासाठीही जिल्हा रुग्णालयात किंवा चाचणी घेतलेल्या ठिकाणी यावे लागत होते. परंतु तांत्रिक सुधारणांमुळे नागरिकांना त्यांचे अहवाल मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचा हेलपाटा वाचत होता.
जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाने कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या ठिकाणी संकलित केलेले, तसेच जिल्हा रुग्णालयात घेतलेल्या बहुतांश स्वॅबची तपासणीही जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये होते. दररोज दोन ते तीन हजार चाचण्या या ठिकाणी होत असतात. वेळेमध्ये चाचणीचा अहवाल मिळाल्यास नागरिकांवर उपचारांना लवकर सुरुवात होते. त्यामुळे रुग्ण गंभीर स्थितीत जाण्यापासून बचावतो.
परंतु, रविवारपासून या लॅबमधील यंत्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे तपासणीसाठी घेतलेले नमुने पुणे, मुंबईला पाठवण्यात आले आहेत.
चौकट: तोपर्यंत अहवालाचा एसएमएस येणार नाही
घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल मिळण्यास एक दिवस उशीर होणार आहे. हे अहवाल मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ज्या ठिकाणी तपासणीचे नमुने दिले त्याच ठिकाणी जाऊन अहवाल पहावा लागणार आहे. लॅबमधील यंत्रामध्ये आलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीनंतर यंत्राचा चाचणी घेऊन टेस्टिंग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.