सचिन काकडे
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत कोरोनामुळे अनेक स्थित्यंतरे घडून आली. काहींची रोजीरोटी बंद झाली, तर काहींना रोजगाराला मुकावे लागले. कोरोनाची सर्वाधिक झळ बसली ती तरुणाईला. मात्र महाबळेश्वर तालुक्यातील तरुणाईने संकटांचा हिमतीने सामना करत व्यवसायाची नवी वाट शोधली. कोणी कृषी पर्यटन सुरू केले तर कोणी स्ट्रॉबेरीची शेती समृद्ध केली. कोणी स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू केला, तर कोणी हॉटेल व्यवसाय भक्कम केला. स्वतःबरोबरच इतरांना रोजगार उपलब्ध करणाऱ्या या तरुणाईने आज अनेकांपुढे नवा आदर्श उभा केलाय.
महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक. ब्रिटिश काळापासून या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. तालुक्यातील सुमारे दोन हजार शेतकरी या शेतीशी जोडले गेले आहेत. तर येथील तरुणाईने उच्च शिक्षण घेऊन नोकरीला प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील हजारो तरुण आज खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीचा अशा शेकडो कंपन्यांना मोठा फटका बसला. दीड वर्षाच्या कालावधीत अनेक कंपन्या बंद पडल्या, तर काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. नोकरी गेल्याने आता करायचे काय? या विवंचनेत तरुणाई हतबल झाली आहे; परंतु महाबळेश्वर तालुक्यातील तरुणाईने संकटापुढे गुडघे न टेकता त्यांचा हिमतीने सामना केला.
कोरोनामुळे शेकडो तरुणांनी पुन्हा घराची वाट धरली. घरवापसी झाल्यानंतर काही तरुणांनी आधुनिक तंत्राची जोड देत स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली. काहींनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. तर शंभरहून अधिक तरुणांनी महाबळेश्वरच्या निसर्ग संपत्तीचा फायदा घेत कृषी पर्यटनाला चालना दिली. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी, भिलार, अवकाळी, मेटगुताड, दांडेघर, माचुतर अशा ठिकाणी शंभरहून अधिक लहान-मोठी कृषी पर्यटन केंद्र आज पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत. कोरोनाच्या कालावधीत या तरुणांनी आपल्या शेतशिवारात व निसर्गाच्या सान्निध्यात कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले व ते पूर्णत्वास आणले.
(चौकट)
निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असतात. अशा पर्यटकांना आता कृषी पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे. काही तरुणांनी स्ट्रॉबेरीच्या शेतात पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय काहींनी वाचनालयेदेखील सुरू केली आहेत. महाबळेश्वरच्या निसर्ग संपत्तीची परिपूर्ण माहिती पर्यटकांना पुस्तक रूपात येथे उपलब्ध केली जाते. स्ट्रॉबेरीच्या हंगामात पर्यटक स्वतः मळ्यात जाऊन स्ट्रॉबेरी तोडू शकतात व तीची गोडी चाखू शकतात.
(पॉइंटर)
२३५ तरुण स्ट्रॉबेरी शेतीकडे वळले
११० तरुणांनी कृषी पर्यटन सुरू केले
१३ तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला
(कोट)
मी पिंपरी चिंचवड येथील एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत चांगल्या पगारावर कार्यरत होतो; परंतु आता नोकरी शाश्वत राहिलेली नाही. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा संकल्प केला आणि बचतीच्या पैशातून भिलार या गावी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले.
- अभिजित भिलारे, भिलार
(कोट)
कोरोनाचा आम्हालाही फटका बसला. मात्र आम्ही हतबल न होता काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रयत्न केले आणि कृषी पर्यटनाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करावा असेच आम्हाला वाटते.
- अमोल भिलारे, भिलार
फोटो मेल :