भुर्इंज : राज्यात नवे सरकार येताच आरटीओने बंद केलेली बेकायदेश्ीर ओव्हरलोड वाहतूक पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु झाली आहे. नव्या सरकारचा अंदाज आल्यानेच आरटीओने पुन्हा एकदा ओव्हरलोड वाहतुकीकडे विशेष कारणाने दुर्लक्ष सुरु केले की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. डंपरमधून विशेषत: गौण खनिजाची परवानगीपेक्षा दुप्पट क्षमतेने अधिक वजनाची वाहतूक आता सर्रास होत असून त्यामुळे रस्त्यांची वाट लागत आहे. मात्र विशिष्ट हेतूने या बेकायदा वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उपप्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या नियमानुसार ६ चाकी वाहनांना १0 टन तर १0 चाकी वाहनांना १६ टन वजनाची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र अधिक फायद्याच्या हेतूने सध्या ६ चाकी वाहनांमधून १८ ते २0 टन तर १0 चाकी वाहनांमधून २८ ते ३0 टन वाहतूक केली जात आहे. विशेषत: वेळे ते सातारा मार्गावर अशाप्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून त्यामध्ये खडी, मुरुम, डबर, वाळू अशा गौण खनिजाचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जादा क्षमतेची वाहतूक होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम महामार्गावर होत असून ठिकठिकाणी रस्त्याची चाळण होत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात सध्या महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता या रस्त्याला महामार्ग का म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महामार्गाची अशी अवस्था झाली असल्याने अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महामार्गाच्या या अवस्थेमुळे झालेल्या अपघातातून अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. एवढी बिकट परिस्थिती असूनही महामार्गाची दुरुस्ती केवळ दिखावा म्हणून केली जात असून महामार्गाची दुरवस्था होवू नये यासाठी ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात नाही. किंबहुना विशिष्ट हेतूनेच या ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या ठिकाणांहून अशा प्रकारची वाहतूक सुरु होते अश ठिकाणांची माहिती कारवाईचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांना माहिती असते. अशा ठिकाणी त्यांचे नियमितपणे जाणे येणे असते. नवे सरकार येताच ते बंद झाले होते आणि त्यामुळे ओव्हरलोड वाहतूकही बंद झाली होती. पण नव्या सरकारचा अंदाज आल्याने ओव्हरलोड वाहतूकीला संबंधितांनी हिरवा कंदील दाखवला की काय? असा प्रश्न पडण्याइतपत परिस्थिती दिसून येत आहे. (प्रतिनिधी)दूरगामी विचार व्हायला हवा. ओव्हरलोड वाहतुकीचे दुष्परीणाम निश्चितच मोठया प्रमाणावर आहेत. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीवर केला जाणारा मोठा खर्च कुचकामी ठरतो. त्यातूनच अपघातांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे कुणाचीही भीडभाड न ठेवता बेकायदेशीरपणे आणि विशिष्ठ हेतूने सुरु असणारी ओव्हरलोड वाहतून बंद केली पाहिजे. आधी अधिक क्षमतेच्या वजनाचा भार पेलणारे रस्ते तयार करा आणि खुशाल वजन क्षमतेत वाढ करा, असे मत व्यावसायिक शेखर भोसले पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
ओव्हरलोड वाहतुकीला आलाय जोर!
By admin | Published: February 26, 2015 8:37 PM