सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन चालवून नियमाचे उल्लंघन करत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायू वेग पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून एका महिन्यात तब्बल ५२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरूनच वाहन चालक किती बेफिकीर आहेत, हे दिसून येते.
कोरोनामुळे गत सहा महिने अनेकजण घरात कोंडून होते. कसलेही व्यवहार सुरू नव्हते. मात्र, लॉकडाऊन शिथिली झाल्यानंतर अनेकजण कामानिमित्त बाहेर पडले. पण रस्त्यावर वाहन चालविताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करतच सुटले. नित्यनियमाने कारवाई करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर या पथकाने महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी केंद्र उभारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. अनेक वाहने धोकादायक पद्धतीने चालविण्यात येत होती, तर काही विनापरवाना प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या पथकाने कोणाचीही गय न करता कारवाईचा बडगा उगारला. अनेक वाहन चालकांनी आपल्या चुकीची किंमत म्हणून एका महिन्यात तब्बल ५२ लाख उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत भरले आहेत. केवळ वाहन चालकांच्या चुकीमधून एक महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम पाहून वाहन चालकांकडून मोटार नियम कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळेच अपघातातही वाढत झाली आहे. बेफिकीर चालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियम पाळून वाहन चालविले तर ना दंड द्यावा लागेल ना कारवाईला सामोरे जावे लागेल. स्वत:चा अन् दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. या दृष्टीने प्रत्येक वाहन चालकाने विचार करणे गरजेचे असल्याचे मत वायू वेग पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चालतंय चालू द्या, अशी भूमिका ठेवून अनेक वाहन चालक मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करत आहेत. असे वाहन चालकच या पथकाच्या हाती लागत आहेत.
चौकट : रात्री होतायत सैरभर!
महामार्गावर अनेक वाहनचालक विशेषत: रात्रीचे सैरभैर होत आहेत. त्यामुळे वायू वेग पथक नियम डावलणाऱ्या अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहन चालविण्याचे प्रकार तर रात्रीचे सर्वाधिक घडत आहेत. परिणामी सर्वाधिक महसूल हा रात्रीचा जमा होत आहे.
कोट : वाहन चालकांनी मोटार नियम कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. परिणामी अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. हे कुठेरी थांबायला हवे.
विनोद चव्हाण,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा