फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागते. मात्र, फलटण उपजिल्हा रुग्णालयात उलटाच प्रकार सुरू होता. शासकीय मशिन्स खासगी रुग्णालयाला वापरण्यास दिल्या होत्या. रुग्णालयाचा हा कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर रात्रीत शासकीय रुग्णालयात आणून ठेवण्यात आले. आता त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा एवढीच फलटणकरांची अपेक्षा आहे.
व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने फलटण शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. गोरगरीब जनतेला कोणीही वाली नसल्याने अनेक गोरगरिबांनी कोरोना रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतात. त्याठिकाणी व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेक कुटुंबांतील प्रमुख व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावर जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. हा गंभीर विषय ‘लोकमत’ने गेल्या पाच दिवसांपासून माहिती घेऊन रुग्णालयामध्ये कशा प्रकारे काम केले जाते, हे पाहून अखेर व्हेंटिलेटर मशिन्सचा कसा गैरप्रकार केला जातो, हे निदर्शनास आले.
तसेच रुग्णालयात रुग्णांना पोर्टेबल मशीनवर ठेवले जाते. एखादा रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर व्हेंटिलेटरची गरज भासते. त्यावेळी रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते किंवा सातारामधील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करावे लागते. जम्बो कोविड सेंटर पूर्ण भरल्याने नातेवाइकांना एकच पर्याय तो म्हणजे खाजगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करणे. त्याठिकाणी पैशाचा बाजार असल्याने रुग्णांना अखेर व्हेंटिलेटरअभावी जीव गमवावा लागतो.
चौकट
व्हेंटिलेटर खासगीत जाते मग डॉक्टर सरकारी रुग्णालयात येऊ शकत नाही का?
शासकीय रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नाही, असे कारण व्हेंटिलेटर मशीन न वापरण्याबाबत सांगितले जाते. ज्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मशीन घेऊन गेले त्या हॉस्पिटलमधील फिजिशयन डॉक्टर सरकारी रुग्णालयात येऊ शकत नाही का? खाजगी हॉस्पिटल शासकीय योजनेचे लाभ घेतात अशा हॉस्पिटलने सध्या कोविडच्या काळामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये मदत करणे आवश्यक आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
चौकट
आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनाची फलटणकरांची मागणी
शासकीय व्हेंटिलेटर मशीन खाजगी हॉस्पिटलला वापरायला देऊन शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन व्हावे व यामुळे रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी फलटणमधील नगारिक आणि मृतांचे नातेवाईक करत आहेत.
रुग्णालयात व्हेंटिलेटर नेमके किती?
फलटणसारख्या मोठ्या शहरातील सरकारी रुग्णालयात किमान १० ते १५ व्हेंटिलेटर मशिन्सची आवश्यकता आहे. मात्र, रुग्णालयात नेमके किती मशिन्स आहेत, याबाबत डॉक्टर संदिग्धता ठेवत आहेत. किती मशिन्स बाहेर दिले आणि किती आणले हा विषय महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच आणखी मशिन्सची आवश्यकता आहे. त्याचीही व्यवस्था करणे आवश्यक आहे.