कुडाळ : जावळी तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या म्हाते खुर्द ग्रामस्थांनी दातृत्व भावनेतून गावातील प्राथमिक शाळेत ऑक्सिजनयुक्त कोरोना नियंत्रण कक्ष उभारून सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे. कोरोनाविरुद्ध सामाजिक कार्याचा ठसा सगळीकडे उमटवत जावळीतील इतर गावांना आदर्श घालून दिला आहे.
गावच्या आरोग्यासाठी म्हाते खुर्द गावाने असा स्तुत्य असा उपक्रम राबवला असून, गावच्या प्राथमिक ज्ञानमंदिराचे रूपांतर आरोग्य मंदिरात केले आहे. यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने अत्यावश्यक सुविधायुक्त सुसज्ज असा ‘कोरोना नियंत्रण कक्ष’ उभारण्यात आला आहे. सरपंच राजाराम दळवी यांच्या संकल्पनेतून गावात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त बेड, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, बायपॅक मशीन अशा अत्यावश्यक साहित्यासह, स्वच्छतागृह, फॅन, मनोरंजनासाठी टीव्ही, वाफारा मशीन, पल्समीटर, टेम्परेचर, पीपीई किट अशा सर्व गरजेच्या वस्तूंचा सामावेश करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी सोपान टोपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांच्या उपस्थितीत कोरोना कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील इतर गावांनी अशा पद्धतीचे अनुकरण करावे व म्हाते खुर्द गावचा आदर्श घ्यावा, असे आवाहन या वेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. कोरोना नियंत्रण कक्ष म्हाते खुर्दसाठी लागणारा सगळा खर्च मुंबई स्थित ग्रामस्थ, युवावर्ग, नवयुग विकास मंडळ, नवयुग सहकारी विकास पतपेढी, ग्रामस्थ मंडळ म्हाते खुर्द ह्यांच्या आर्थिक साहाय्यातून करण्यात आला आहे. तसेच समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, विजय सावले, बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी आणि सचिन दळवी आदींनी याकरिता मदत केली आहे.
या वेळी शिक्षक नेते रघुनाथ दळवी, उपसरपंच चंद्रकांत सपकाळ, सुभाष दळवी, सखाराम दळवी, विजय दळवी, शिवराम दळवी, संजय दळवी, विकीभाई दळवी, अभिजित दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
(चौकट)
ज्ञानमंदिर झाले आरोग्यमंदिर...
आज प्राथमिक शाळा विद्यामंदिर म्हाते खुर्दचे रूपांतर आरोग्य मंदिरात करण्यात आले. जागतिक महामारीच्या संकटात ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता गावात प्राथमिक स्वरूपाची उपाययोजना करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला व कोरोना फंड जमा झाला. त्यातूनच गावात कोरोना निर्मूलन कक्ष निर्माण झाला. ग्रामस्थ व मुंबईकर ग्रामस्थ यांनी दोन लाखांवर निधी जमा केला. नवयुग विकास मंडळ मुंबई व इतर मुंबईकर ग्रामस्थांकडून याकरिता मोलाची साथ मिळाली.