कोरेगावमध्ये मार्च व एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. रुग्णसंख्या वाढत गेल्याने गाव हादरले. यातच तिघा कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाचीही चिंता वाढली. कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांना स्थानिक पातळीवर प्राणवायूची सुविधा तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी ऑक्सिजन मशीन खरेदी करण्याचा निर्णय झाला. ही खरेदी लोकसहभागातून करण्याचे ठरले. तसे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आहे. उत्स्फूर्तपणे लोकांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. या मदतीतून ऑक्सिजन मशीन खरेदी करण्यात येणार आहे. गावात ज्या-ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना ती मशीन डॉक्टरांच्या सल्ल्याने लावली जाणार आहे.
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सध्या ग्रामस्थ चिंतेत आहेत. प्रशासनाकडून गावात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीही संसर्ग थांबत नसल्याची परिस्थिती आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यातच तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने धास्ती आणखी वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ऑक्सिजन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.