सातारा : ‘साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि विविध ग्रामीण रुग्णालये अशा १७ ठिकाणी नवीन ऑक्सिजन प्लांट उभे राहणार आहेत,’ अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेत पत्रकारांशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीतही सातारा जिल्हा परिषदेचे सर्व विभाग काम करीत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे व्हेंटिलेटर, तसेच ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. याचा विचार करून सातारा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एनडीआरएफने आर्थिक सहकार्य केले आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे; पण लसींचा तुटवडा आहे. लस पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली तर सातारा जिल्हा रोज एक लाख लोकांना लसीकरण करू शकतो. जिल्ह्यात येणारी लस ठराविक तापमानाला ठेवण्यासाठी आवश्यक असणारे रेफ्रिजरेटरही खरेदी केलेले आहेत, अशी माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी दिली.