दिलीप पाडळे पाचगणी: पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या संबधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा ३.० हे अभियान राज्य शासानामार्फत राबविण्यात आले होते. यामध्ये पाचगणी नगरपरिषदेने राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याबद्दल समस्त पाचगणीकर जनतेमधून प्रशासकीय अधिकारी व नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी तोंड भरून कौतुक होत आहे.
माझी वसुंधरा ३.० हे अभियान राज्य शासनाच्या वतीने राज्यभर १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविले गेले. यामध्ये पाचगणी नगरपरिषदेने १५०००/- लोकसंख्येच्या आत असलेल्या वर्गवारीत लहान शहरांच्यामध्ये राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचे बक्षिसाचे स्वरूप राज्यस्तर २ कोटी, व भूमी थिमाटीक उच्चतम कामगिरी १.५० कोटी, असे एकूण ३.५० कोटी बक्षीस पालिकेने पटकावले आहे.
आज मुबई येथे एका विशेष सोहळ्यात विधान परिषद अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व प्रधान सचिव प्रविण दराडे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालिका आरोग्य अधिकारी सुरेश मडके,आरोग्य निरीक्षक गणेश कासूर्डे, उपस्थित होते.
याअगोदर पाचगणी नगरपरिषदेने केंद्रस्थरावर देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक, तर थ्री स्टार नामांकन, घन कचरा व्यवस्थापन यामध्ये बक्षीस असा देशभर आपल्या नावाचा झेंडा रोवला आहे. आता राज्यपातळीवर पुन्हा एकदा माझी वसुंधरा ३.० मध्ये राज्यस्तरावर आपल्या नावाचा डंका पिटला आहे. यामुळेच पाचगणी नगरपरिषदेचे नाव देश तथा जागतिक पटलावर कोरल गेलं आहे. यातून विकास कामांना गती प्राप्त झाली आहे.गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत प्रशासकीय कारभार पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हाकित आहेत. तर प्रशासकीय कालावधीत अनेक कामे प्रगतीपथावर असून अनेक कामे जोमात सुरू आहेत. प्रशासक व अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी हातात हात घालून काम करीत असल्यानेच माझी वसुंधरा ३.० अभियानाची कामगिरी यशस्वी झाली आहे.