लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : नैसर्गिक चक्रीवादळाच्या दणक्याने पाचगणीमधील विद्युत वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला असून, गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाचगणीतील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
पाचगणी शहर व परिसराला चक्रीवादळाचा प्रचंड फटका बसला आहे. वादळाने शहरातील विद्युत व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. यात उच्चदाब वाहिनीचे सहा खांब जमीनदोस्त झालेत तर लघु दाब वाहिनीच्या ५० खांबांचे नुकसान झाले. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता कंत्राटी ३० व महावितरणाचे २२ कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता आणखी दोन दिवस लागू शकतात.
पाचगणी शहराला होणारा पाणी पुरवठा महाबळेश्वर येथून होत असतो. त्याठिकाणी सुध्दा अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.