मायणी : खटाव तालुक्यातील पडळ येथील कोरोना केअर सेंटरला ग्रीनको ग्रुप ऑफ खांडकेकडून ५० बेड देण्यात आले आहेत. तरीही हे कोरोना केअर सेंटर यशस्वी चालवण्यासाठी शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
खटाव तालुक्यातील पडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये शासकीय कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. ७० बेड समतेच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरुवातीला वीस बेडची उपलब्धता करून या कोरोना केअर सेंटरचा प्रारंभ करण्यात आला; मात्र परिसरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता ही उपलब्धता फार थोडक्या स्वरूपाची होती. खटाव तालुका महसूल विभागातील मायणी मंडल अधिकारी महेश चक्के यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रीनको ग्रुप ऑफ खांडकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास गाताडे यांच्या विशेष सहकार्यातून या कोरोना केअर सेंटरला या ग्रुपकडून ५० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, तलाठी शंकर चाटे, तलाठी गणेश पिसे, अनिल गोरे, विश्वास कोकरे, पडळ कोरोना सेंटरचेे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
(चौकट)
अडचणी मार्गी लावा..
पडळ येथील या कोरोना केअर सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरची सोय नाही. ऑक्सिजन बेड, अपुरे वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाप यासह असंख्य अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने व शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
०७पडळ
पडळ (ता. खटाव) येथील कोरोना केअर सेंटरला वैद्यकीय साहित्य देताना प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे व ग्रीनकोचे पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)