वडूज : पडळ (ता. खटाव ) येथील खटाव - माण अँग्रो प्रोसेस लि. पडळ येथे कार्यरत असणारे अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांना मारहाण करुन त्यांचा खून केल्या प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, त्यांचे बंधू संग्राम घोरपडे आदी २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोज भीमराव घोरपडे (वय ४४), संग्राम भीमराव घोरपडे ( ४०), सनी दयानंद क्षीरसागर (२६), रणजीत धनाजी सूर्यवंशी (२२ ), शुभम राजेंद्र घाडगे ( २२ )रोहित रामदास कोलुगडे ( २५ ) यांना वडूज पोलीसांनी ताब्यात घेतले. सदर गुन्हयातील संशयीत सहा जणांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना मंगळवार दि. १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की , पडळ येथील खटाव- माण अँग्रो प्रोसेस लि. पडळ कारखान्यात कार्यरत असणारे प्रोसेसिंग मुख्य अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय ४० रा गोवारे, ता. कऱ्हाड) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू मारहणीत झाल्याची चर्चा होती. जगदीप थोरात यांनी कारखान्यावर नोकरी करत असताना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून कारखान्याचे संचालक मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा व अनोळखी १० ते १२ यांनी फायबर काठी, ऊस, सळी तसेच लाथाबुक्यांनी बुधवारी दि .१० रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान मारहाण केली.
यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला. तसे जाबजबाबही पोलिसांनी घेतले. दरम्यान, थोरात यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याने कऱ्हाड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादी वरून जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी.ए.अंजनकुमार,अशोक नलवडे,शेंडगे मामा आणि अनोळखी दहा ते बारा जणांच्यावर ३०२, १४३, १४७, १४८, १४९ व ३२३ कलमान्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सपोनी मालोजीराजे देशमुख व पोलीस उपनिरिक्षक शितल पालेकर करीत आहेत.