सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कारासाठी राहीबाई पोपेरे व इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार दिलीप वळसे पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.येत्या, सोमवारी (दि-९) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कर्मवीर पुण्यतिथीचे औचित्य साधून संस्थेतर्फे समाजाच्या विकासासाठी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी माजी मंत्री व रयतचे उपाध्यक्ष दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांना कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अडीच लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख स्वीकारणार आहेत.कोंभाळणे जिल्हा नगर येथील बीज माता राहिबाई पोपेरे यांना रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अडीच लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार यावर्षी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेला २५ लाखांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या थोर देणगीदार यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती डॉ. अनिल पाटील यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील निवड झालेल्या अधिकारी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी व कर्मवीर पारितोषिक मिळविले यांच्या प्रमुख यांचा सन्मान खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.
गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर कर्मवीर पुरस्कार, येत्या सोमवारी होणार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 2:58 PM