लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केवळ बारावी शिक्षण झालेला युवक अचानक घरातल्यांना सांगतो, मी ‘राॅ’चा अधिकारी झालोय. हे ऐकून घरातले भारावून जातात. पै पाहुणे, मित्रांकडून त्याच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव होतो. थ्री स्टार असलेली वर्दी दोन दिवसांतच घरात येते. गोरा गोमटा, असल्यामुळे खाकी वर्दीचा रुबाब अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडत होता. इतकेच काय, याच खाकी ड्रेसला भुलून प्रेयसीही गळाला लागली; परंतु जेव्हा त्याचे खरे रूप बाहेर आलं तेव्हा साऱ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली.
ही कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी असून, ज्या युवकाने हा सारा प्रताप केलाय, त्याचे नाव नयन घोरपडे असे आहे. अवघ्या २३ वर्षांच्या या तरुणाने आई-वडिलांसह पै पाहुणे, मित्र, गावकऱ्यांना कसं मामा बनवलं, हे सध्या सातारकरांच्या औत्सुक्याचं ठरलंय.
नयन हा मूळचा सातारा तालुक्यातील गजवडीचा; पण सध्या आई-वडील, लहान बहीणसह तो साताऱ्यातील शनिवार पेठेत वास्तव्य करतोय. शहरातील एका हाॅस्पिटलमध्ये तो गत काही महिन्यांपासून कम्पाऊंडर म्हणून काम करीत होता. एके दिवशी अचानक नयन घरी गेला. ‘मी परीक्षा पास झालो असून, मी ‘राॅ’चा अधिकारी झालोय, असं त्याने घरातल्यांना सांगितलं. एकुलता एक आपला मुलगा अधिकारी झाला, हे एकून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कानोकानी ही बातमी साऱ्या गावात, त्यानंतर पै पाहुण्यांपर्यंत पोहोचली. साऱ्यांना पेढे वाटण्यात आले. इतकेच काय त्याच्या मित्रांनी त्याच्याकडून पार्टीही झोडली. हाॅस्पिटलमध्ये कम्पाऊंडर असलेला नयन थेट ‘राॅ’चा अधिकारी बनल्याने साऱ्यांनाच त्याचा अभिमान वाटला; पण इकडे नयनच्या मनात वेगळेच काही तरी चालले होते. त्याने आई-वडिलांसह सर्वांनाच आपण अधिकारी बनल्याचे खोटे सांगितले होते. त्याने सात हजारांचा पीसआयचा गणवेश शिवून घेतला. दोन दिवसांतच त्याचा हा नवा कोरा ड्रेस घरात आला. अंगात वर्दी घालून त्याने लागलेच फोटो सेशनही केले. व्हाॅटॲप, फेसबुकवर त्याने फोटो झळकवले. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता वेळ आली ती ड्यूटीवर जाण्याची. घरात कपाटावर गणवेश अडकवून तो सकाळी घराबाहेर पडत होता. म्हणे राॅ चा अधिकारी असल्यामुळे साध्या वेशात ड्यूटीवर जावे लागते. त्यामुळे त्याची फारशी कोणाला शंकाही आली नाही; पण घरातून बाहेर पडलेला नयन कथित राॅच्या ऑफिसमध्ये जाण्याऐवजी रुग्णालयातील कम्पाऊंडरच्या कामासाठी जाऊ लागला. तेथेही तो मी अधिकारी असल्याचे सांगत; पण कोणाला समजू नये म्हणून मी हे काम करतोय, असं सांगत होता, तर घरातल्यांना पोलीस हेडक्वाॅर्टर हे त्याचे ऑफिस असल्याचे तो भासवायचा. केवळ काही तरी वेगळे करून आपल्याबद्दल इतरांना हेवा वाटावा, यासाठीच आपण ही बनवेगिरी केल्याचे तो सांगतोय. दोन महिन्यांच्या काळात त्याने ना कोणाला फसवले ना कोणाला पैसे मागितले; पण आई-वडिलांच्या विश्वासाला त्याने तडा तर दिलाच; पण त्यांची स्वप्न आणि भावनांशी तो खेळल्याचे दु:ख याहून त्याच्या आई-वडिलांना काय असेल.
चाैकट : वडिलांनी धरले मुलाचे पाय...
एकुलत्या एक मुलाचा कारनामा ऐकून वडील अस्वस्थ झाले. पोलीस ठाण्यात त्यांना बोलावण्यात आल्यानंतर मुलगा नयनला पाहून त्यांना रडू कोसळलं. त्याचे पाय धरत ‘तू हे कशासाठी केलेस,’ असं त्याला विचारू लागले. सरतेशवेटी पोलिसांनी धीर देऊन त्यांना मुलाची करतूत सांगितली.
चाैकट : प्रेयसी महसूल खात्यात नोकरीला...
नयनने अंगात वर्दी घालून फेसबुकवर परजिल्ह्यातील एका युवतीशी सूत जुळविले. प्रेयसीलाही तो ‘राॅ’चा अधिकारी असल्याचे सांगायचा. त्यामुळे दोघांचे रोज बोलणे व्हायचे; पण त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनीच संबंधित मुलीला खरी हकीकत सांगितली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. संबंधित मुलगी महसूल खात्यामध्ये नोकरी करते.
चाैकट : खऱ्याखुऱ्या खाकीलाही चकवा...
नयन साहेब झाला म्हटल्यावर अनेक जण त्याला अधूनमधून पोलीस ठाण्यातील काही वशिल्याची कामे सांगत. असेच एका युवकाचे व्हेरिफिकेशन करायचे होते. यासाठी नयन सातारा शहर पोलीस ठाण्यात गेला. पीएसआय असल्याचे सांगून त्याने खऱ्या खुऱ्या पोलिसांनाही चकवा दिला. खुद्द साहेबच आले म्हटल्यावर चुटकीसरशी व्हेरिफिकेशनही झालं. मग काय त्याचा रुबाब आणखीनच वाढला. कधी कोणाची गाडी पकडली, तर कधी कोणाची भांडणे झाली, तर हा हा बोगस राॅ चा अधिकारी मध्यस्थी करायचा.