तळमावले : गेले दोन दिवस ढेबेवाडी, काळगाव विभागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यातच या विभागातील जितकरवाडी येथे डोंगर खचला असून, येथील घरांपासून काही अंतरावरच दोन मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. रात्रीच्यावेळी ही घटना घडली. यावेळी वेळ आली होती; पण काळ आला नव्हता, म्हणूनच येथील अनेक ग्रामस्थ बचावले.
वांग मराठवाडी धरणाच्या पाठीमागील बाजूला जिंती गाव आहे. जिंती गावात अनेक वाड्यावस्त्या आहेत. जिंतीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, सावंतवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी या वस्त्या आहेत. त्यापैकी जितकरवाडीच्या वरच्या बाजूला असलेला डोंगर खचल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील घरांपासून काही अंतरावर दोन मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. जितकरवाडीमध्ये सुमारे तीस घरे आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त येथील अनेकजण मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वास्तव्याला आहेत. तसेच या सर्व गावांना एकाच पुलावरुन जाता येते. गतवर्षी उद्घाटनापूर्वीच हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर दोन्ही बाजूला भराव टाकला होता. मात्र, यावर्षीही पावसामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भराव पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
वांग मराठवाडीच्या धरणातील पाण्याचा फुगवटाही या गावांकडे पसरला आहे. प्रचंड पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जितकरवाडीच्या ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर होते म्हणूनच घरापासून काही अंतरावर दरड कोसळली. प्रशासनाने या गोष्टीची तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
फोटो : २४ केआरडी ०२
कॅप्शन : जितकरवाडी (ता. पाटण) येथे असलेला पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. (छाया : पोपट माने)