पेट्री
शहराच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात गुरुवारी रात्री घाटाच्या सुरुवातीलाच वळणावर सततच्या मुसळधार पावसाने दरड कोसळली. दरड रस्त्यालगत, तसेच पाणी वाहून नेणाऱ्या चरीमध्ये कोसळली असल्याने वाहतुकीस कोणताही अडसर निर्माण झाला नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे; परंतु पाणी वाहून नेणाऱ्या चरीवर दरड कोसळून चर बुजून रस्त्यावर पाणी, माती, बारीक दगड काही प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यापासून शहराच्या पश्चिमेकडे पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसाने गुरुवारी रात्री यवतेश्वर घाटात लहान स्वरूपात मुरूम, माती, दगड अशा दरडी रस्त्यालगतच्या चरीत पडून चर बुजून गेला आहे. पाण्यासोबत रस्त्यावर मुरूम, माती येऊन वाहनचालकांना कोणताही अडसर निर्माण होऊ नये यासाठी दरड हटविण्याची मागणी वाहनचालक, पर्यटकांतून होत आहे.
दरवर्षी या घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वारंवार व मोठ्या प्रमाणावर घडत असते; परंतु यंदा घाटातील बहुतांशी रस्ता रुंदीकरण केल्याने मागील महिन्यात कोसळलेल्या दरडी रस्त्यावर आल्या नाहीत, तसेच बहुतांशी ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंती बांधल्यामुळे रस्त्यावर मुरूम, माती येण्यास अडथळा निर्माण झाला. काल कोसळलेल्या दरडीमुळे चर बुजून माती, पाणी, बारीक दगड काही प्रमाणात रस्त्यावर आले आहेत.
चौकट
गेल्या पाच-सहा दिवसांपासून घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळत आहेत. घाटात डोंगरालगत असुरक्षित ठिकाणी उभे राहून काही पर्यटक फोटोसेशन करतानाचे चित्र अद्यापही दिसत आहे. त्यामुळे हे धोकादायक ठरून दरड कोसळून जिवावर बेतू शकते.
फोटो ओळ : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे.
(छाया -सागर चव्हाण )