पेट्री : कास मार्गावरील पारंबेफाटा ते एकीवदरम्यानच्या रस्त्यावर चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मातीचा ढीग, तसेच झाड रस्त्यावर आले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने, तसेच घसरटीचे प्रमाण वाढले आहे. लवकरात लवकर दरड हटविण्याची मागणी वाहनचालक, ग्रामस्थांतून होत आहे.
शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस पडून बहुतांशी ठिकाणी दरड कोसळली. झाडे उन्मळून पडली. रस्ते खचले आहेत. घराची पडझड झाली असून, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कित्येक पूल पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पारंबेफाटा ते एकीवदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर चार-पाच दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून मुरूम, झाडे, माती पूर्णतः रस्त्यावर आली आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे.
पारंबेफाटा ते एकीवदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर मधोमध झाड पडल्याने, तसेच मातीचा ढीग रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहने चालविताना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या मार्गावरील कोसळलेली दरड संबंधित विभागाने तत्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थ, वाहनचालंकातून होत आहे.
कोट
रस्त्याच्या मधोमध झाड, तसेच मातीचा ढीग पडल्याने वाहतूक अडचणीची होऊ लागली आहे. रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने बाजूने वाहन नेल्यास घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर माती आल्याने अधूनमधून पडणाऱ्या पावसाने घसरट निर्माण होऊन अपघाताचा संभव आहे.
- ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा, ता. जावली
फोटो २७पेट्री-दरड
पारंबे फाटा ते एकीवदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळून मार्गावर माती, झाडे आली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. (छाया : सागर चव्हाण)