पेट्री : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दरड कोसळली होती. या धोक्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने घाटातील दरड हटविण्याचे काम बुधवारी युद्धपातळीवर हाती घेतले.
सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वर, कास, बामणोली परिसरातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले असतानाच दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळ व पावसाचा पश्चिम भागाला जोरदार तडाखा बसला. दरम्यान, मंगळवारी सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातही काही ठिकाणी दरड कोसळली होती. कोसळलेल्या दरडीमुळे वाहतुकीस अडथळा होत नसला, तरी चरी बुजल्याने पाणी, माती, मुरूम काही प्रमाणात रस्त्यावरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने चरीतून दगड, माती हटवावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून केली जात आहे.
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील दरड हटविण्याचे काम बुधवारी युद्धपातळीवर हाती घेतले. दरडी हटविण्याबरोबरच बुजलेल्या चरी मोकळ्या करण्याचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो : १९ सागर चव्हाण
सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील दरड हटविण्याचे काम बुधवारी बांधकाम विभागाने हाती घेतले. (छाया : सागर चव्हाण)