मल्हारपेठ : डिजिटल बॅनरमुळे थर्माकॉलवर पेंटिंग करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईस आला असताना शासनाने थर्माकॉलवरही बंदी घातल्यामुळे आता हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे.प्लास्टिक बंदीनंतर शासनाने आता थर्माकॉल बंदी केली आहे. त्यामुळे हस्तकला असणाºया पेंटिंग व्यवसायाला घरघर लागली आहे.
गेल्या सात-आठ वर्षांपासून डिजिटल बॅनरचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे कापडी बॅनर, बाजारपेठेतील दुकानावरील नावे, भिंतीवरील हस्तकला लोप पावली. हाताने पेंटिंग करणाºया ब्रशला विश्रांती मिळाली. यामुळे जवळपास पेंटर व्यवसाय करणाºयांचा ५० टक्के व्यवसाय थांबला. त्यात दुचाकी, चारचाकी गाडीवरील नंबर प्लेटही रेडियम कटिंग मशिनरीने होऊ लागल्यामुळे हस्तकलेला मार बसला आहे.
शासनाने थर्माकॉल बंदीही केली आहे. यामुळे हाताची कला दाखवून पेंटिंग व्यवसायावर चालू असणारे संपूर्ण मार्ग बंद होणार आहेत. थर्माकॉलमुळे लग्नसाईत विवाह सोहळ्यात वधू-वरांची नावे, वाढदिवसाची नावे, नामकरण सोहळा, तसेच गुढीपाडवा, दसरा व दीपावलीसह इतर सणासाठी दुकानाच्या काचेवर चिटकविण्यासाठी लागणारी हार्दिक शुभेच्छांची नावे, बँका, पतसंस्था यांच्या वर्धापनदिनानिमित्त लागणारी अक्षरे आता डिजिटल बॅनरमध्ये करावी लागणार आहेत. थर्माकॉलला पर्याय नसल्यामुळे पेंटिंग व्यवसाय करणाºयांना दुकानांची शटर बंद करण्याची वेळ आली आहे. हस्तकला असूनही कमी पैशात मोठमोठे डिजिटल बॅनर मिळत असल्यामुळे अंगणवाडीमध्येही आता बोलक्या भिंतीवर डिजिटल बॅनर चिटकवले जात आहेत. यामुळे पेंटिंग व्यवसायाला घरघर लागली आहे.
गणेशोत्सवात थर्माकॉलची मंदिरे बनविण्यातूनही अनेकांचा व्यवसाय होत होता. मात्र आता तोही बंद झाल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना दुसरा व्यवसाय किंवा नोकरी पत्करावी लागणार आहे.दहा-बारा वर्षांपूर्वी हस्तकला असणाºया पेंटर व्यवसायाला चांगले दिवस होते. दसरा-दीपावली काळात कापडी बॅनर, बाजारपेठेतील दुकानाचे लोखंडी फलक, शुभकार्याच्या वेळी घरावर रंगरंगोटी व नावे काढण्याचा व्यवसाय जोमात सुरू होता. अर्जंट आलेल्या ग्राहकांना दोन दिवस काम करण्यासाठी वेळ भेटत नव्हता. व्यवसायही चांगल्या पद्धतीने चालू होता. त्यातून पैसेही चांगल्या पद्धतीने मिळत होते. मात्र डिजिटलमुळे व्यवसायास मार बसला आहे.
हस्तकलेला कोठेही वाव नाहीडिजिटल बॅनरमुळे व्यवसाय बसला तर आता थर्माकॉल बंदीमुळे व्यवसाय बंद करावा लागणार आहे. महागड्या अत्याधुनिक डिजिटल बॅनर, रेडियम कटिंग मशिनरी घेणे परवडत नसल्यामुळे आता दुकान बंद करून कोठेतरी नोकरी करावी लागणार आहे. हस्तकलेला कोणत्याही क्षेत्रात वाव उरला नसल्यामुळे हस्तकला असून, ही सर्व पेंटरवर उपासमारीची वेळ येणार आहे.- जितेंद्र मस्के, मल्हारपेठथर्माकॉल बंदीमुळे गणपती उत्सवात गणेश मंदिर, दुर्गादेवीस डेकोरेशन व शुभ कार्यासाठी थर्माकॉलच्या सीटची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. त्यातून ३० ते ४० टक्के नफा मिळत होता. मात्र शासनाने बंदी घातल्यामुळे अनेक स्टेशनरी व्यावसायिकांचा व्यवसाय बुडणार असून, वार्षिक उत्पन्नात आर्थिक फटका बसणार आहे.- योगेश भोसले, विक्रेते, मल्हारपेठ