सातारा : अक्षर ओळख असणारे पालक अन् शेती-मजुरीची संस्कृती असणाऱ्या सामान्य घरातील युवकाने एकाचवेळी पोलीस उपनिरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही परीक्षेत यश मिळविले. लोकांची घरं रंगवणाºया मोहन फडतरे यांचा मुलगा अक्षयच्या या यशाने अवघं देगाव सुखावलं आहे.
देगाव येथे राहणारे मोहन आणि अलका फडतरे यांना मयूर आणि अक्षय ही दोन मुलं. त्यातील अक्षय शेंडेफळ म्हणून लाडाचा! लहानपणापासूनच तो अभ्यासतही हुशार होता. मिळेल त्या साधनांची सांगड घालून त्याचे अभ्यासाची कास धरली. घरात अमूक नाही आणि मला तमूक हवं, असं कधीच त्यानं केलं नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्याही काळजात राहिला. कधी कंदील लावून तर कधी मित्रांच्यात जाऊन त्याने आपले गृहपाठ केले. शाळेत शिक्षक शिकवतील ते मन लावून ऐकणं आणि घरी येऊन त्याची उजळणी करणं, हा त्याचा ठरलेला दिनक्रम. देगावच्या धर्मवीर विद्यालयातून दहावी झाल्यनंतर तो लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दाखल झाला. येथेही मयूर केंजळे आणि निखिल कदम या दोन मित्रांच्या संगतीने त्याला स्पर्धा परीक्षांचं विश्व खुणावू लागलं. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात तासन्तास बसून त्याने पुस्तकांच्या वाचनाचा सपाटा लावला. कॉलेजमध्ये अभ्यास अन् घरी शेताची काम करत तो पदवीधर झाला. ‘मला पुढं शिकायचं आहे’ हे वडिलांना सांगायच्या आधीच चार शहाण्या माणसांनी अक्षयच्या अभ्यासात खंड न पाडण्याचा सल्ला दिल्याने त्याचे पुण्यात स्पर्धा परीक्षांचे शिक्षण सुरू झाले. प्रसंगी ‘चार काम जास्त घेईन, रात्रीच काम करीन; पण तू अभ्यासात ढिला पडू नकोस,’ हे वडिलांचे शब्द त्याला बळ देऊन गेले.स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर सातारा सोडावे लागेल, हे लक्षात घेऊन त्याने पुणे गाठले. वडिलांनी दिलेले मोजके पैसे पुरवून पुरवून तो दोन वर्षे पुण्यात राहिला. पहिल्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक आणि चौथ्या प्रयत्नात राज्य कर निरीक्षक परीक्षेत त्याने यशमिळविले.
आई-वडिलांच्या संघर्ष आणि त्यागातून मला शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे भविष्यात राज्य कर निरीक्षक पदावर रुजू होऊन त्यांचे अपूर्ण स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. या परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढण्यासाठीही स्थानिक युवकांना या परीक्षांविषयी माहिती देण्याचं काम पुढील दोन महिने करणार आहे.-अक्षय फडतरे