लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सातारा पालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या महालसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात पहिल्या दिवशी २ हजार ३८९ नागरिकांना लस देण्यात आली.
जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. सातारा शहरातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी पालिकेने देखील कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पालिकेला लसींचे आठ हजार डोस उपलब्ध करण्यात आले असून, पालिकेने मंगळवारपासून शहरात महालसीकरण शिबिर सुरू केले आहे.
पहिल्याच दिवशी शहरातील १३ केंद्रांवर एकूण २ हजार ३८९ नागरिकांना लस देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर पहिल्या व दुसऱ्या डोसचे प्रत्येकी १५० असे ३०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. काही केंद्रांवर नोंदणीवेळी तांत्रिक अडचणी आल्या. दुपारनंतर सर्वच केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. शहरातील सर्व केंद्रांवर बुधवार, दि. २२ रोजी लसीकरण केले जाणार असून, अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
(चौकट)
आज दहा केंद्रांवर लसीकरण शिबिर
नागरी आरोग्य केंद्र, गोडोली
समाजमंदिर, मल्हार पेठ
कूपर कॉलनी सांस्कृतिक हॉल, सदर बझार
महाजनवाडा सांस्कृतिक कार्यालय, मंगळवार पेठ
नगरपालिका मंगल कार्यालय, केसरकर पेठ
मराठा जिमखाना, व्यंकटपुरा पेठ
श्रीपतराव हायस्कूल करंजे, सातारा
भावे बोळ समाजमंदिर, शनिवार पेठ
नागरी आरोग्य केंद्र, कस्तुरबा
नगरपालिका ग्रंथालय, सदर बझार