ज्ञानेश्वर शेवाळे - उंडाळे--पाटीलवाडी, ता. कऱ्हाड येथील बसथांब्यानजीक अवैधरीत्या दारूविक्री सुरू आहे. या दारू धंद्यामुळे तळीरामांना दिवसासुद्धा झिंग चढत असून, हे तळीराम रस्त्यातच उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देत असल्याचे चित्र दिसत आहे. गावठी दारूमुळे तब्बल १०४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी दारू दारूअड्ड्यांवर छापे घालण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी छुप्या पद्धतीने देशी-विदेशी दारूविक्री सर्रासपणे केली जात आहे. या दारूमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पण, दारूविक्रेत्यांना त्याचे काही देणे घेणे नसते. दारू विक्रेत्यावर कारवाई झाली तर पुन्हा त्यांना जामीन मिळून परत तोच धंदा सुरू ठेवण्यात येतो.त्यामुळे दारूविक्रेते कुठल्याही कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी येळगाव गावातील काही महिलांनी एकत्र येऊन दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. तेव्हापासून परिसरात दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, काही दिवसांनी ‘पहिले पाढे पंचावन्न’ या उक्तीप्रमाणे पुन्हा दारूविक्री सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी, दि. २६ रोजी अशाच प्रकारे पाटीलवाडी परिसरात बसथांब्यानजीक घडलेल्या एका घटनेवरून या अवैध दारूविक्रीचे गंभीर परिणाम दिसून येतात. शुक्रवारी येथील बसथांबा परिसरात अशाच एका तळीरामाने भरदिवसा मद्यप्राशन करून परिसरातील ग्रामस्थांना विनाकारण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे ग्रामस्थ पुरते त्रस्त झाले होते. अशा घटना अजून किती दिवस सुरू राहणार, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात होता. दररोज वादावादीचे प्रकारपाटीलवाडी बसथांब्यानजीक मद्यपींचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. हे मद्यपी रस्त्यावरून येण्या- जाणाऱ्यांसह प्रवाशांनाही नाहक शिवीगाळ व दमदाटी करतात. काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, तळीरामाने बोलण्याची हद्द ओलांडल्यानंतर त्याला धडा शिकविण्यासाठीही काहीजण सरसावतात. त्यामुळे येथे वादावादीचे प्रकार घडत आहेत. या घटनांना परिसरातील ग्रामस्थ अक्षरश: वैतागले आहेत.
दिवसाढवळ्या तळीरामांची ‘ड्रामा’बाजी !
By admin | Published: July 01, 2015 9:23 PM