विकास शिंदे
मलटण : पंढरीची वारी, आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत'' या ओव्यांप्रमाणे दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जून रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी लोणंदमध्ये दोन दिवस, तर फलटणमध्ये तालुक्यात चार मुक्काम होणार आहेत. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण सहा मुक्काम असणार आहेत. त्यामुळे माउली भक्तांना एक पर्वणीच ठरणार आहे.पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर होताच, यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसते. अनेक दिंडी चालक व मालक सोहळ्यापूर्वी फलटण तालुक्यातील आपापल्या मुक्कामाच्या स्थळांना भेट देत आहेत. माउलींचा पालखी सोहळा यावर्षी मोठा होणार असल्याने वारकरी भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिंडी चालक सांगतात.सातारा जिल्ह्यातील मुक्काम
- रविवार, दि. १८ जून रोजी पालखी सोहळा नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. रात्री लोणंद येथे सोहळा मुक्कामी असेल.
- सोमवार, दि. १९ जून रोजी पालखी लोणंद येथेच मुक्कामी असेल.
- मंगळवार, दि. २० जून रोजी पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्काम असेल याच दिवशी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल.
- यानंतर बुधवार, दि. २१ जून रोजी फलटण येथे पालखी सोहळा मुक्कामी असेल. दरम्यान सुरवडी, निंभोरे, वडजल येथे काही वेळ विसाव्यासाठी पालखी थांबेल.
- २२ जून रोजी पालखी सोहळा बरड मुक्कामी असेल. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचा प्रवेश होईल.
सातारा जिल्ह्यात नीरा स्नानानंतर पालखीचे आगमन होते, तर बरडच्या सीमेवर धर्मपुरीजवळ पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो पायी वारी सोहळ्याने भाविकांसाठी एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे. अनेक वारकरी या सोहळ्यात सामील होण्यासाठी तयारी करू लागले आहेत.