पाचगणी : ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘स्वतंत्र भारत आणि स्वच्छ सुंदर भारत’ ही दोन स्वप्ने पाहिली होती. त्यांचे ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर ‘स्वच्छ महाराष्ट्र’ घडविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पना आखली आहे. पाचगणीत घनकचरा प्रकल्पाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. पालिकेने स्वच्छतेसाठी राबविलेला हा उपक्रम देशाला आदर्शवत असा आहे,’ असे प्रतिपादन नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी केले. पाचगणी, ता. महाबळेश्वर येथे पालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, मुख्याधिकारी विद्या पोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, वाईचे उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, उपविभागीय अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपनगराध्यक्ष लक्ष्मण पार्टे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. म्हैसकर म्हणाल्या, ‘पाचगणी पालिकेने वाढत्या कचऱ्याच्या प्रश्नाला महत्त्व देऊन लोकसहभागातून, शाळा, सामजिक संस्था आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेले उपक्रम इतरांना पथदर्शी असेच आहेत. जी शहरे स्वच्छ होऊ पाहत आहेत, त्यांना शासनात तर्फे प्रोत्साहनपर निधीची उपलब्धता होणार आहे. याची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री काही दिवसांत करणार आहेत.’ नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर म्हणाल्या, ‘अपुरी कर्मचारी संख्या असतानाही आम्ही लोकसहभागातून पाचगणी शहर स्चव्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पालिकेचा कचऱ्यावर मोठा खर्च होत होता; पंरतु आता तो कमी होणार आहे.’ मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी प्रास्ताविकात विकासकामांची माहिती दिली. तसेच फादर टॉमी, डॉ. भारती बोधे, क्लेरिस्टा डिसिल्वा यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष लक्ष्मण पार्टे यांनी आभार मानले. यावेळी घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्रक्रिया प्रकल्प, कचरा डेपो सुशोभीकरण, अभिलेख संगणकीकरण प्रकल्प, सिडने पॉइंट व पारसी पॉइंटच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास कऱ्हाडच्या नगराध्यक्षा विद्या साळुंखे, वाईचे भूषण गायकवाड, रहिमतपुरचे सुरेश माने, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा उज्क्वला तौष्णिवाल, मलकापूरचे मनोहर शिंदे, संतोष आखाडे, कऱ्हाडचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे, साताऱ्याचे अभिजित बापट, वाईच्या आशा राऊत, पाचगणी पालिकेचे नगरसवेक दिलीप बगाडे, प्रवीण बोधे, दिलावर बागवान, सरोज कांबळे, रेखा कांबळे, सुमन रांजणे, स्मिता जानकर, उज्ज्वला महाडिक, सुनंदा गोळे, कल्पना कासुर्डे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
पाचगणी पालिकेने देशाला आदर्श घालून दिला
By admin | Published: December 03, 2015 12:36 AM