पाचगणी : पाचगणी भाजी मार्केटला शनिवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत सलग सात दुकाने खाक झाली. यामुळे भाजी व्यावसायिकांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दसऱ्याच्या सणामध्ये या व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.पाचगणीतील मंडईत शनिवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोळ व धूर बाजारपेठेत पसरल्याने सर्वजण घटनास्थळी जमा झाले. काहींनी पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकर मागवले त्याने आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, आग आणखीनच वाढत होती. पाचगणी पालिकेच्या बंबाला पाचारण केले. परंतु, त्यात पाणी नसल्याचे समजल्याने महाबळेश्वर पालिकेशी संपर्क साधला. महाबळेश्वर पालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळाने ही आग आटोक्यात आली. परंतु, या दुकानांतील सर्व भाजी जळून खाक झाली होती.शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये गणेश वाडकर, संजय रजपुरे, अल्ताफ बागवान, अनिता कासुर्डे, भास्कर आंब्राळे, सिद्धेश शिंदे, प्रीती आंब्राळे, सोहेल बागवान यांच्या भाजीपाला तसेच दुकानांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.२०१५ च्या दिवाळीची आठवण२०१५ मध्येही दिवाळी हंगामात फटक्यामुळे अशाच पद्धतीने आग लागली होती. त्यावेळीही अशीच मोठी हानी झाली होती. परंतु, त्यावेळी कसलीही नुकसानभरपाई मिळाली नाही. आता दसऱ्याच्या दिवसात अशाच आगीची पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी तरी या व्यावसायिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. परंतु, आतातरी या व्यावसायिकांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Satara: पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; सात दुकाने खाक, लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:30 PM