वाठार निंबाळकर : फलटण शहरवासीयांचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यातील तसेच फलटण तालुक्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड गावात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला. शनिवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचा प्रवेश होणार आहे. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण शहरातील मुक्काम आटोपून व पहाटेची पूजा-अर्चा उरकून ‘चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला।। देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसि समीप दिसे पंढरी याच मंदिरी माउली माझी।।’ या प्रमाने पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. पंढरीच्या वाटेत धुळदेव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अर्जुनराव ननावरे, मार्केट कमिटी संचालक परशुराम फरांदे, व्यंकटराव दडस, माणिकराव कर्णे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. या स्वागतानंतर विडणी गावच्या सीमेवर विडणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुरेश शेंडे, उपसरपंच वैजंता कोकरे, श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासो शेंडे, पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण आदींसह ग्रामस्थांनी स्वागत केले व पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी गावात काही काळासाठी विसावला. या ठिकाणी विडणीसह अलगुडेवाडी, सोमंथळी, सांगवी, माझेरी, कोळकी, धुळदेव, अब्दागिरवाडी, कोळकी, झिरपवाडी आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. विडणी गावातील काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सोहळा सुरू झाला. त्यानंतर पिंप्रद गावच्या सीमेवर गावच्या सरपंच शांताबाई ढमाळ, उपसरपंच शंकर बोराटे, सयाजीराव शिंदे-पाटील, किरण पाटील, संतोष शिंदे आदी ग्रामस्थांनी स्वागत केले. पुढे पिंप्रद गावामध्ये पालखी सोहळा जेवणासाठी विसावला.पिंप्रद येथे पिंप्रद सह वडले, भाडळी खुर्द-भाडळी बु, राजाळे, नाईकबोमवाडी, टाकळवाडे आदी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा पालखी सोहळा सुरू होऊन वाजेगाव येथे काही काळासाठी विसावला. याठिकाणी वाजेगावसह निंबळक मुंजवडी, मठाचीवाडी, साठे, सरडे यासह इतर गावांतील ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घेतला. वाजेगाव येथील काही काळाच्या विसाव्यानंतर पुन्हा सोहळा सुरू झाला. बरड गावाच्या सीमेवर गावचे प्रशासक सरपंच संजय बाचल, ग्रामविकास अधिकारी डी. एस. भोसले, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गावडे, पंचायत समिती सदस्या स्मीता सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले.जिल्ह्यातील व तालुक्यातील शेवटच्या बरड येथील मुक्काम स्थळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील विभाग व पोलिस, आरोग्य, पाणीपुरवठा, वीजवितरण विभाग, बांधकाम विभाग आदी शासनाच्या सर्व विभागांच्या वतीने सर्व सोयीसुविधा मदत कार्य उत्तमरीतीने योग्य नियोजन करुन पुरविल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या वाटेवरील रस्त्याकडेच्या सर्वच गावांच्या वतीने ठिकठिकाणी पालखी सोहळ्यास शुभेच्छा व स्वागतासाठी कमानी व फलक लावण्यात आले होते. तर वारीच्या रस्त्यावरील ग्रामस्थांनी यथावकश आपल्याला कुवतीप्रमाणे जेवणावळी घालून वारकऱ्यांनी मनोभावे सेवा केली. फलटण शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)
पालखी निघाली पंढरी.. निरोप घ्यावा जयहरी!
By admin | Published: July 08, 2016 11:35 PM