कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली हद्दीतील सिंदल ओढा ते बनवडी फाटा यादरम्यान मोकाट श्वानांचा वावर वाढल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड-मसूर रस्त्यावरून मोकाट श्वान फिरत असतात. अचानक वाहनांच्या समोर श्वान आल्याने अपघात घडत आहेत. तर बनवडी फाटा येथे हे श्वान मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. रस्त्यावरच ते ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाड ते विटा रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच वाढलेली बेसुमार झाडेझुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठे खड्डे, वाहन पार्किंगसाठी जागेचा अभाव आदी गंभीर समस्यांमुळे वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. कऱ्हाड-पंढरपूर-विजापूर हा राज्यमार्ग असून त्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाची मान्यता दिली आहे. त्यामुळे रस्त्याला वाढते महत्त्व आले असून ही परिस्थिती लक्षात घेऊन बांधकाम विभागाने रस्त्यानजीकचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
अनेक वर्षांपासून नाल्यांची सफाईच नाही
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नालेनिर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दगड, माती व कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहेत. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे वाढला कल
कोपर्डे हवेली : वाढता उत्पादन खर्च, उत्पादनातील घट, बाजारपेठेत शेतीमालाला मिळणारा अनियमित भाव, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि यामुळे जमिनीचा खालावलेला दर्जा आदी कारणांमुळे कोपर्डे हवेलीसह परिसरातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याकडे कल वाढला आहे. पिकांमध्ये सेंद्रिय खते वापरून वाढीव उत्पादनाबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत असल्याचे दिसून येत आहे. सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठेत मागणीही चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. टोमॅटोसह इतर पिकांमध्येही सध्या सेंद्रिय खते शेतकरी वापरत आहेत.