सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च हातात कुदळ घेऊन जलसंधारणाचे काम सुरू केले. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यात टॅँकरची मागणी करणारी गावं आता पाणीदार तर झाली आहेत. या गावांनी आता एवढ्यावरच न थांबता इतर गावांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी व्यक्त केली.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील वेळू, न्हावी बुद्रुक व खटाव तालुक्यातील वरूड या पाणीदार झालेल्या गावांचा दौरा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक अविनाश पोळ, प्रदेश समन्वयक आबा लाड उपस्थित होते. वेळू गावामध्ये ग्रामस्थांनी लोकसहभागातून राबविलेला तलाव जोड प्रकल्प, अटल आनंद घनवन योजनेची वृक्षारोपण, न्हावी बुद्रुक येथील मियावाकी जंगल, वरूड येथील जलसंधारणाची कामे व पीक पद्धतीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. विनय गौड यांनी वेळू येथील बोअरवेलचा हातपंप मारला असता एक हात पंपामध्ये पाणी येत आहे. हे पाहून आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी अविनाश पोळ व आबा लाड यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समृद्ध गाव योजनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी पाऊस पडेल, तेव्हा पाणी साठवून ठेवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे आहे. या जाणिवेतून चर खणणे, शेततळी, तलाव जोडणे, विहिरी असे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष भूजल पातळीत झालेल्या पाण्याच्या वाढीतून, विहिरींमध्ये दिसणाऱ्या पाण्याच्या पातळीवरून दिसू लागले आहेत. आगामी काळात कमी पाण्यावर जास्त उत्पन्न वाढवणारी पिके घेणे, परिसरातील जंगलाचे क्षेत्र वाढीसाठी वृक्षारोपण, सकस चारा उपलब्ध होण्यासाठी दर्जेदार गवतांची लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच उत्पादन केलेल्या माल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राहुल भाेसले, दयानंद निकम, जितेंद्र शिंदे, अजित जगदाळे, यशदाचे मास्टर ट्रेनर स्वप्नील शिंदे, मंडल कृषी अधिकारी सुजित शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे पांढरे, यांत्रिक विभागाचे संग्राम पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.