सातारा : जिल्हा परिषदेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारा नगर पालिकेच्या हद्दवाढीच्या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साताऱ्याच्या हद्दवाढीसंदर्भात खासदार उदयनराजे यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे सातारा शहराचा विस्तार येत्या दोन महिन्यांत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत साताऱ्याच्या हद्दवाढीचा ठराव दि. २३ डिसेंबरला एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्रिशंकू भाग आणि परिसरातील चार ग्रामपंचायती पालिकेमध्ये समाविष्ट होणार असल्याचे स्पष्ट झाले. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार ‘साविआ’चे पक्षप्रतोद अॅड. दत्ता बनकर हे हद्दवाढीचा पाठपुरावा करत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना हद्दवाढीसंदर्भात खासदार उदयनराजे यांनी लिहिलेले पत्र घेऊन दोन दिवसांपूर्वी अॅड. बनकर हे स्वत: मंत्रालयात गेले होते. शहराचा वाढता विस्तार पाहता साताऱ्याच्या हद्दवाढीसाठी तातडीने पावले उचलावीत, असे त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या शिफारशीनंतर हद्दवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्यानंतर साताऱ्याच्या हद्दवाढीला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. सातारची हद्दवाढ व्हावी, यासाठी सर्व यंत्रणा सकारात्मक आहेत. (प्रतिनिधी)सातारा शहरासह परिसरात वसाहतींचा वाढत चाललेला बकालपणा, वाढते अतिक्रमण, कचऱ्यांचे प्रश्न, सांडपाण्याचे अनियोजन, रस्त्यांची दुरवस्था, ओढ्यावर होत असलेले अतिक्रमण यामुळे विकासकामावर परिणाम होत होता. वाढत चाललेल्या वस्तीमुळे भविष्यात खेळांचे मैदान, बागांचे आरक्षण यालाही मर्यादा येत होत्या. तसेच त्रिशंकू भागाचा विकासही होत नव्हता. हद्दवाढीचा मुद्दा समोर येत असल्यामुळे विकासकामांसाठी अडचणी यायच्या. त्यामुळे पालिकेची हद्दवाढ व्हावी, यासाठी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शासनाकडे प्रस्ताव व पाठपुरावा सुरू आहे. शाहूपुरी, खेड, कोडोली, जकातवाडी, दरे बुद्रुक, विलासपूर यासह शहर परिसरातील त्रिशंकू भागांचाही त्यामध्ये समावेश आहे.
पंकजा मुंडेंना हद्दवाढीचे पत्र
By admin | Published: December 31, 2015 10:48 PM