सातारा : मुख्यमंत्र्यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याचे एकेक किस्से पोलिसांच्या तपासात समोर येत असून, यापूर्वी त्याने एका गावामध्ये चक्क अतिरेकी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीमुळे त्याने संपूर्ण पोलीस दलाला सळो की पळो करून सोडले होते. एवढेच नव्हे तर तक्रारींचा बादशहा म्हणूनही त्याला ओळखले जाते.फेसबुकवर चक्क मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर हा पंकज कुंभार कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला. तो काय करतो, कुठे राहतो? इथपर्यंत त्याची चौकशी सुरू झाली. पोलिसांनीही आपल्या परीने त्याची हिस्ट्री तपासली असता अनेक रंजक किस्से त्याचे समोर आले. गेल्या पाच वर्षांपूर्वी पंकजने जिल्हा पोलीस दल अक्षरश: हादरून सोडले होते. सातारा तालुक्यातील एका गावामध्ये अतिरेकी येत असून, त्यामध्ये स्थानिक नागरिकांचा हात असल्याचा अर्ज त्याने थेट पोलीस अधीक्षकांकडे दिला होता. परंतु अशा प्रकारची खोटी माहिती दिली म्हणून जमाव प्रक्षुब्ध झाला होता. अखेर हे प्रकरण पोलिसांनी कौशल्याने हाताळून शांत केले होते. मात्र, तरीही पंकजच्या उचापती अधूनमधून सुरूच असतात. शासकीय कार्यालयामध्ये अमूक ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तमूक अधिकाºयाने पैसे खाल्ले आहेत. अशा प्रकारचे एक ना एक अर्ज शासकीय कार्यालयात देत राहणे, हा पंकजचा रोजचा फंडाच असायचा. त्याच्या अर्जामुळे शासकीय कार्यालयातील अधिकारी हतबल होऊन जात होते. काही वेळेला त्याच्या अर्जामुळे चांगली कामेही झाली असल्याचे गावकरी सांगतायत. गावच्या शेजारून जाणाºया कॅनॉलवर झाडेझुडपे वाढली होती. त्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्यामुळे एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी पंकजने ही झाडेझुडपे काढण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या पाठपुराव्यामुळे ही झाडेझुडपे काढण्यात आली होती, असा किस्साही एका जबाबदार व्यक्तीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.असा सापडला पंकज...मुख्यमंत्र्यांसंदर्भात पंकजने फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर त्याचा पोलिसांनी मोबाईल मिळविला. त्याच्याशी गोड बोलून ‘तू कुठे आहेस,’ असे त्याला विचारल्यानंतर त्याने मुंबई येथील नालासोपारा येथे असल्याचे सांगितले. ‘तू नालासोपारा येथील पोलीस ठाण्यात जा आणि तुझा मोबाईल पोलिसांना दे, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे,’ असे पोलिसांनी त्याला सांगितले. हे ऐकून पंकज तेथील पोलीस ठाण्यात गेला. त्याने तेथील पोलिसांना त्याचा मोबाईल दिला. त्यावेळी सातारा पोलिसांनी तेथील पोलिसांना ‘या युवकाला पकडा. त्याने मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तो हाच आहे,’ असे सांगितले. त्यानंतर नालासोपारा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न दवडता पंकजला ताब्यात घेतले. अशा प्रकारे सातारा पोलिसांनी दाखविलेल्या चक्रव्यूहात पंकज अलगद सापडला. त्यामुळे पोलिसांना फारशी धावाधाव करावी लागली नाही.पंकजचाअसाही वापर...पंकजला पुढे करून अनेकजण शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज करत होते. एखाद्या अर्जप्रकरणातून अंगलट आलं की, पंकजला पुढे करायचे आणि साधलं की माझ्यामुळं झालं, अस सांगणारी लोक पूर्वी त्याच्या संपर्कात होती. परंतु ज्यावेळी तो पुण्यात गेला. तेव्हापासून त्याची संगत तुटली होती. मात्र, आता पुन्हा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पंकजच्या सणसणाटीने पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:12 PM