सातारा : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या बंदला सातारा शहरात प्रतिसाद मिळाला. रविवार हा बाजाराचा दिवस असूनही शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती. त्यामुळे रस्त्यावर तुरळक नागरिक दिसत होते. या बंदमुळे शहर बससेवा, पेट्रोल पंपही सायंकाळपर्यंत बंद होते. रुग्णालये मात्र सुरू होती. दरम्यान, आमआदमी पार्टीचे जिल्हा संयोजक सागर भोगावकर यांनी कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंडन केले. कोल्हापूर येथे कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. कॉ. पानसरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. ‘भाकप’च्या या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ‘रिपाइं’ या पक्षासह अनेक डाव्या संघटनांनी पाठिंबा दिला होता. साताऱ्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार हा सातारच्या बाजारचा दिवस असतो. तरीही या बंदला प्रतिसाद मिळाला. शहरातील सदाशिव पेठेतील सर्व दुकाने सायंकाळी पाचपर्यंत बंद स्थितीत होती. त्याचबरोबर राजपथ, पोलीस मुख्यालय रस्ता, राजवाडा परिसर या भागातील दुकानेही बंद होती. राजवाड्यावरील हातगाडे दिवसभर बंद होते. राजवाडा चौपाटी सायंकाळी सहानंतर सुरू झाली. या बंदमध्ये पेट्रोल पंप धारकांनीही सहभाग घेतला होता. शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद होते. वाहनधारकांना पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती नसल्याने अनेकांना माघारी परतावे लागले. सायंकाळी पाचच्या सुमारास पेट्रोल पंप सुरू झाले. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा असणारे रुग्णालये, मेडिकल्स दिवसभर सुरू होती. बंदमुळे राजवाडा परिसरातही प्रवासी कमी होते. रिक्षा अनेकवेळ जागेवर थांबून असल्याचे चित्र दिसत होते. सातारकर नागरिकही आज दिवसभर घराबाहेर पडले नव्हते. राजवाड्यावरील फळांचे गाडे बंद स्थितीत होते. राजवाडा बसस्थानक परिसरातही अपवाद वगळता कोणीही प्रवासी दिसत नव्हता. त्यामुळे या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तसेच ‘आप’चे सागर भोगावकर यांनी कॉ. पानसरे यांच्या हत्येचा निषेध करीत पोवई नाक्यावर मुंडन केले. या बंदमध्ये माकप, भारिप बहुजन महासंघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सीपीआय, सीपीएम, मुक्ती युवा संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कऱ्हाडातही कडकडीत बंद पाळून निदर्शने करण्यात आली. तसेच शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. (प्रतिनिधी) कॉमे्रड गोविंद पानसरे यांना लाल सलाम देण्यासाठी रविवारी कऱ्हाडमध्ये माजी नगरसेवक कॉमे्रेड बादशाहा मुल्ला, मुनीर काझी, भानुदास वास्के, भारती वास्के, कॉ. पाटील यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच शहरातून मोर्चा काढून पानसरेंना लाल सलाम देण्यात आला. कऱ्हाडात बंदला प्रतिसाद कऱ्हाड : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कऱ्हाडातून प्रतिसाद मिळाला. शहरातील शनिवार पेठ, दत्त चौक परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या जिल्हा समितीने शहरात निदर्शने केली. शहरातील शनिवार पेठ, गुरूवार पेठ, मंगळवार पेठ, दत्त चौक, कृष्णा नाका परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. व्यापाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला. फेडरेशन जिल्हा समितीचे नवनाथ मोरे, सायली अवघडे, चेतन शेळकंदे, अमोल जाधव, जगदीश भोये, योगेश भोये, योगेश गवळी, अभय जाधव, ओंकार खरात, जे. एस. पाटील, मुनीर काझी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडईपासून चावडी चौक, दत्त चौक येथे निदर्शने केली.
बंद पाळून पानसरेंना आदरांजली
By admin | Published: February 22, 2015 10:13 PM