सातारा : ‘सैनिकांची पंढरी असणाऱ्या मिलिटरी अपशिंगे गावची आदर्श आमदार गाव योजनेत निवड करण्यात आली आहे. या गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी जबाबदारीने दर्जेदार कामे करून हे गाव शंभर टक्के सर्वसोयीनियुक्त आदर्श गाव निर्माण करावे,’ असे आवाहन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी केले.‘आदर्श आमदार गाव’ योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील मिलिटरी अपशिंगे या गावाची निवड झाली आहे. या गावच्या विकासासाठी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी यावेळी उपस्थित होते.सहपालकमंत्री खोत म्हणाले, ‘उरमोडी नदी या गावातून वाहते. या नदीवर बंधारे बांधता येतील का? याचा प्रामुख्याने विचार करावा. तसेच जलयुक्त शिवार अभियानातून येथे काही कामे करता येतील का तेही पाहावे. ओढाजोड प्रकल्प राबविण्यात यावा. शिक्षण विभागाने शाळेला कशाची गरज आहे त्याचे पुस्तक तयार करावे. प्राथमिक व माध्यमिक शाळांना संगणक उपलब्ध करून द्यावे. सर्व विभागांनी एकत्र चर्चा करून या गावच्या नागरिकांच्या काय मागण्या आहेत याचे एक पुस्तक १० एप्रिलपर्यंत तयार करावे, या पुस्तकाचे गावातच प्रकाशन करून गावाच्या विकासकामांना सुरुवात केली जाईल. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आपण काम करतो आहोत, ही जाणीव ठेवून कामे दर्जेदार करावीत.मिलिटरी अपशिंगे गाव पाणंद रस्ते मुक्त करून येथील पाणंद रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून संपूर्ण जिल्हाच पाणंद मुक्त रस्ते करण्याचा प्रयत्न करावा. क्रीडा विभागाने सुसज्ज अशी व्यायाम शाळा उभारणीसाठी आराखडा तयार करावा. या गावात मी प्रत्येक महिन्याला मुक्काम करणार आहे. नागरी सुविधा केंद्र, एटीएम मशीन तसेच राष्ट्रीयकृत बँकेची शाखा येथे सुरू केली जाईल. अश्विन मुदगल यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
जवानांच्या पंढरीचा अभिमान
By admin | Published: March 27, 2017 11:56 PM