सातारा : सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून, ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांची डागडुजी न करण्यात आल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या वतीने या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.सातारा पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांचे पावसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अंतर्गत रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून या खड्ड्यांचे आकारमान वाढत चालले असून, खड्ड्यांत वाहने आदळून वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. शहरातील जुना आरटी चौक, तांदूळ आळी, फुटका तलाव परिसर, काळा दगड परिसर या भागात अशा खड्ड्यांची संख्या मोठी आहे. पालिकेने या खड्ड्यांची अद्याप डागडुजी न केल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीचे सागर भोगावकर व कार्यकर्त्यांनी जुना आरटीओ चौकातील खड्ड्यांत कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
साताऱ्यातील खड्ड्यांमध्ये सोडल्या कागदी होड्या!, आप'ने नोंदविला अनोखा निषेध
By सचिन काकडे | Published: July 25, 2023 1:13 PM