सातारा : समांतर रंगभूमी थंडावली, असे बोलले जात असले तरी वेगवेगळे प्रयोग करून नाट्यसंस्कार पुढे नेण्याचे प्रयत्न होतच असतात. मराठी रंगभूमी दिनानिमित्त एकांकिकांचा प्रयोग आयोजित करणाऱ्या ‘संवाद’ या संस्थेनं प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळविण्यासाठीही समांतर पॅटर्न शोधून काढला असून, ३५ कलावंत ठिकठिकाणी पथनाट्यं सादर करून या प्रयोगाचं चक्क ‘प्रमोशन’ करणार आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात समांतर नाट्यपरंपरेने बाळसे धरले होते. नंतर ही परंपरा काहीशी विस्कळीत झाली आहे हे नक्की; पण धडपडणारे रंगकर्मी नवनवीन क्लृप्त्या योजून समांतर नाट्यचळवळीला बळकटी देण्याचे प्रयत्न सातत्याने करताना दिसतात. प्रेक्षक नाट्यगृहापासून दूर गेला की नाटकवाले प्रेक्षकांपासून दूर गेले, हा प्रश्न ‘कोंबडी आधी की अंडे’ या प्रश्नासारखा अंतहीन आहे; मात्र व्यावसायिक नाटकांनाही पूर्वीसारखी गर्दी होत नाही, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर, सातारची नाट्यपरंपरा अखंडित राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्थांमधील ‘संवाद’ हे एक ठळक नाव आहे. पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन. हे औचित्य साधून चार एकांकिकांचा खुला प्रयोग सातारच्या शाहू कला मंदिरात या संस्थेतर्फे केला जाणार आहे. कमी वेळात मोठा आशय घेऊन येणारा एकांकिका हा नाट्यप्रकार केवळ स्पर्धांपुरता मर्यादित राहू नये, तर एकाच वेळी अनेक विषय जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांनी साधावी, या हेतूनं संस्थेने ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’, ‘आकडा’, ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ आणि ‘वुई द पीपल’ या चार एकांकिकांचा प्रयोग आयोजित केला आहे. हौशी रंगकर्मींचा प्रयोग म्हणजे घरोघर जाऊन प्रवेशिका देणं, त्यातून मिळणाऱ्या रकमेतून नेपथ्य, संगीत तयार करणं आणि त्यातून ऊर्जा वाचवून तालमी करणं, हे गृहितच असतं. त्यातून वेळ आणि शक्ती वाचवून हे ३५ कलावंत आता ‘प्रमोशन’साठी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. (प्रतिनिधी) कलावंत बदलून करणार प्रयोग आठवडाभर पथनाट्ये करणाऱ्या कलावंतांनाच रोजची तालीम आणि नंतर प्रयोग सादर करायचा आहे. मुख्य प्रयोगासाठी आवाजासह शारीरिक क्षमताही टिकून राहणं गरजेचं आहे; त्यामुळं पथनाट्यात दररोज संस्थेचे कलावंत आलटून-पालटून सहभागी होतील. काय असेल पथनाट्यात... टीव्ही चॅनेलच्या धबडग्यात नाटकासारखी रसरशीत कलाकृती पाहणं किती आनंददायी आहे, तीन तासांत एकच नाटक पाहण्याऐवजी चार वेगवेगळे विषय देणाऱ्या चार एकांकिका पाहण्यात काय गंमत आहे, आपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असणारं समांतर नाटक टिकणं कसं आवश्यक आहे, हे नाटक उभं करणं किती अवघड आहे, याबाबत पथनाट्यांमधून प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच सादर होणाऱ्या एकांकिकांचा ‘ट्रेलर’ही दाखविला जाणार आहे.
सातारच्या रंगकर्मींचा असाही ‘समांतर पॅटर्न’
By admin | Published: October 28, 2015 11:09 PM