सातारा : मुलाच्या प्रेमसंबंधामुळे पारधी कुटुंबाला तब्बल दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कर्ज काढून ऐंशी हजार भरल्यानंतरही उर्वरित रक्कम मिळावी, म्हणून भरविलेल्या जातपंचायतीच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर, अंनिस आणि पुसेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत, पाचजणांच्या विरोधात पुसेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.बेकायदा जातपंचायत भरवून शिक्षा ठोठावणे आणि सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या कारणासाठी मदन लक्ष्मण शिंदे, लाव्हाऱ्या ल. शिंदे, विकास मिन्या शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, इंद्रा चंद्रकांत शिंदे यांच्यावर माधुरी धनु भोसले यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने गुन्हा दाखल केल्याची माहिती जातपंचायत विभागाचे शंकर कणसे, मोहसीन शेख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली आहे.माधुरी धनु भोसले यांच्या तरुणाचे एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पंचांनी जातपंचायत भरवून त्यांना पाच महिन्यांपूर्वी सुमारे दोन लाख रुपये दंड ठोठावला होता. हा दंड न भरल्यास, त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी देण्यात आली होती.
समाजाच्या दबावाने हातावर पोट असलेल्या माधुरी भोसले यांनी कर्ज काढून कसेबसे ऐंशी हजार रुपये पंचांना दिले. उरलेले एक लाख वीस हजार रुपये त्यांनी द्यावे, यासाठी ९ जानेवारी रोजी पुसेगाव येथे पंचांमार्फत जातपंचायत भरविण्यात आली होती. यावेळी पंचांनी माधुरी भोसले आणि त्यांच्या मुलीला चाकूने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.