सातारा : पत्नीचा जाचहाट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश दिनकर मानकुमरे (वय ३०, रा.भुतेघर ता.जावली) याला जिल्हा न्यायाधीश १ ए.जे. खान यांनी ३ वर्षाची साधी कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अर्चना गणेश मानकुमरे (वय २०, रा. भुतेघर ता.जावली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई कोंडाबाई रामचंद्र मोरे (वय ५८, रा.ऐरणे ता. महाबळेश्वर) यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, अर्चना यांचा गणेश मानकुमरे याच्याशी २००९ साली विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तिचा जाचहाट सुरू झाला. यातूनच २ जून २०१२ रोजी मध्यरात्री अर्चनाने घरामध्ये रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत त्या १०० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक राजेश नाईक यांनी या घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी गणेश मानकुमरे याला तीन वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. उर्मिला फडतरे व अॅड. ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले. प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस हवालदार भास्कर निकम यांनी सहकार्य केले.