सातारा : खासगी शाळांनी ‘जेवढी सेवा तेवढेच पैसे’ या तत्त्वावर फीची आकारणी करावी या मुद्द्यावर ठाम असलेल्या सातारा जिल्हा पालक संघाने दहा टक्के फी माफीला कडाडून विरोध दर्शविला आहे. वर्षभरात शाळा बंद असल्याने जिल्ह्यातील खासगी शाळांच्या संघटनेने विद्यार्थ्यांची दहा टक्के फी माफी करण्याचा निर्णय घेतला होता, त्याला पालक संघाने ठाम विरोध दर्शविला आहे.
कोरोनाचा संसर्ग डिसेंबरपासून कमी होताच सुरुवातीला नववी, दहावी आणि त्यानंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. पण अवघ्या दीड महिन्यांत पुन्हा कोरोना वाढल्याने हे वर्ग बंद करण्यात आले. या दीड महिन्यात खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक सुविधांची फी व ऑनलाईन वर्गाच्या फीची आकाराणी करण्याची अावश्यकता आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधांची फी आकारण्याबाबत चर्चा झाली होती. खासगी शाळांनी याची पूर्तता न करता फीमध्ये केवळ १० टक्के सूट घेण्याचा सरसकट निर्णय पालक संघाला मान्य नाही.
कोरोनामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती गंभीर झालेली असताना इंटरनेट व नवीन मोबाइल घेण्यासाठी भुर्दंड बसला आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये नर्सरीच्या वर्गाचीही तब्बल ३० ते ५० हजारांची मागणी करत आहेत. आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आर्थिक स्थिती नसलेल्या पालकांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे मत पालक संघाचे प्रशांत मोदी यांनी व्यक्त केले आहे.