लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आई-बाबा, स्वत:सह आमच्यासाठी मास्क प्राधान्याने वापरा, असे भावनिक आवाहन शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना दक्षता घेण्याबाबतचा सल्ला दिला. त्याबाबत ‘लोकमत’ने ‘रियालिटी चेक’ केले. आई-वडील घरातून बाहेर पडताना आवर्जून मास्क वापरतात. सॅनिटायझरचा उपयोग करतात. बाहेरून घरामध्ये आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुतात, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. कामाच्या गडबडीत काहीवेळा त्यांच्याकडून हे राहिल्यास आम्ही त्यांना त्याची आठवणही करून देत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
चौकट
स्वत:ची काळजी घ्या आणि आई-बाबांचीही काळजी घ्या !
प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
प्रतिक्रिया
माझे बाबा कामावर जाताना मास्क, सॅनिटायझर वापरतात. घरी आल्यानंतर पहिल्यांदा हात-पाय स्वच्छ धुतात. आईदेखील कोरोनाच्या नियमांचे पालन करते. कोरोना पुन्हा वाढत असल्याने आम्ही काळजी घेतो.
- स्वयम जाधव, इयत्ता दहावी, मंगळवार पेठ
कामानिमित्त घरातून बाहेर जाताना माझे आई-वडील मास्कचा वापर करतात. सॅनिटायझरही सोबत ठेवतात. बाहेरून घरामध्ये आल्यावर हात-पाय धुतल्यानंतर इतर कामे करतात.
- शोएब खान, इयत्ता सहावी, सदर बझार
माझे आई-बाबा दोघेही नोकरदार आहेत. ते कामानिमित्त दिवसभर बाहेर आहेत. त्यामुळे ते मास्क, सॅनिटायझर वापरतातच. घरामध्ये आल्यानंतर आंघोळ करून अन्य कामे करतात. घरातून बाहेर जाताना त्यांनी मास्क विसरल्यास त्यांना मी आठवण करून देतो.
- देवराज फडतरे, दुसरी, कोरेगाव
माझे आई, वडील आणि भाऊ हे मास्क, सॅनिटायझरचा वापर करतात. मीदेखील शाळेत जाताना ते आवर्जून वापरतो. कोरोना वाढत असल्याने शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यावी. आपल्या आई-वडिलांनाही त्याची आठवण करून द्यावी.
- राजवर्धिनी घोरपडे, इयत्ता सातवी, गोडोली
माझे आई, बाबा कामासाठी बाहेर जाताना सॅनिटायझर, मास्कचा वापर करतात. माझी शाळा अद्याप सुरू झालेली नाही; पण, आई अथवा बाबांसमवेत बाहेर जाताना मी सॅनिटायझर, मास्कचा वापर करते.
- कुलसुम फरास, इयत्ता पहिली, तलाठी कॉलनी
आम्ही घरातील सर्वजण मास्क, सॅनिटायझरच्या वापर करतो. काहीवेळा कामाच्या गडबडीत आई किंवा बाबा हे मास्क विसरून घरातून बाहेर पडल्यास ते लक्षात येताच लगेच घरात येऊन ते पुन्हा घेऊन जातात.
- युवराज देशमुख, इयत्ता सातवी,
प्रतिक्रिया
कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर जाताना घरात असलेल्या अन्य कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासह कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
\\\\\