फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही रविवारी नुकसानग्रस्त भागाचा अर्धवट पाहणी दौरा केला. रस्त्यावरच्या २-३ गावांनाच भेटी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. हा दौरा गांभीर्यपूर्वक झालाच नाही, अशा प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या फळबागा, पिके व अन्य नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकरी व सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यातील कापडगाव, तरडगाव, काळज आणि फलटण शहरात बाणगंगा नदीपात्राची तसेच खचलेल्या पुलाची पाहणी केली.फलटण तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब व अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, सोयाबीन, मका ही पिकेही वाया गेलीत. त्याचबरोबर उसाच्या नवीन लागणी पूर्णपणे वाया गेल्या आहेत. तर उभ्या उसाचेही सतत पाणी राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करून मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्यामार्फत सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवतारे यांनी फलटण प्रशासनाला स्पष्ट शब्दात केल्या आहेत.फलटण तालुक्यात शेती, पिके तसेच रस्ते, साकव, तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी, पाईपलाईन वाहून गेल्या आहेत. याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही शिवतारे यांनी दिले आहेत. तसेच फळबागांशिवाय कांदा, सोयाबीन, मका व बाजरी पिकाचे मोठं नुकसान झालंय. मक्याचे ४-५ एकरांचे मोठे प्लॉट अक्षरश: उद्ध्वस्त झालेत. त्याचा चारा म्हणूनही उपयोग होणार नाही. द्राक्षं व डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा निश्चित आकडा समजण्यास काही कालावधी लागणार आहे. मात्र, त्या नुकसानीची नोंदही प्रशासनाने घ्यावी, असेही पालकमंत्री शिवतारे यांनी अधिकाºयांना सांगितले.दरम्यान, पालकमंत्री शिवतारेंनी बाणगंगा नदीवरील खचलेल्या शहरालगतच्या पुलाची व नदीपात्राची पाहणी केली. त्यानंतर पंचनाम्याची सूचना संंबंधित यंत्रणांना करण्यात आली. तसेच तरडगाव येथील सतीश झुंजार यांनी बाजरी व सोयाबीन पिकाबाबत झालेल्या नुकसानीची आणि कुटुंबावर ओढविलेल्या परिस्थितीची माहिती दिली. अशी परिस्थिती तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकºयांवर आली असल्याचे निदर्शनास आणून देत नुकसान भरपाईबरोबरच संपूर्ण कर्जमाफीची मागणीही केली.दौरा दिखाव्यापुरताचनिरगुडी, धुमाळवाडी, खडकी या भागातील द्राक्षं व डाळिंबासह अन्य फळबागांचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पालकमंत्री तिकडे न फिरकल्याने शेतकरी संतप्त झाले. या भागातील सुमारे १०० एकरवरील क्षेत्रातील हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर आभाळच कोसळले आहे. तर पालकमंत्र्यांनी नियोजित दौरा पूर्ण न करता केवळ रस्त्यावरील २-३ गावांनाच भेटी देऊन दौºयाचा देखावा करीत तहसील कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या. अशा संतप्त भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या.
रस्त्यावरीलच गावांना पालकमंत्र्यांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 11:14 PM