लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तब्बल अकरा महिने शाळेपासून लांब राहिल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा नियमितपणे सुरू होणार म्हटल्यावर बच्चेकंपनी भलतीच हरकली आहे. पण, आता दोन महिन्यांसाठी नवीन गणवेशासह साहित्य खरेदीच्या आर्थिक ताणाने पालक चांगलेच बिथरले आहेत.
राज्यातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बातमीने चिमुकल्यांच्या विश्वात आनंदाचे वातावरण आहे. शाळेत जाऊन अभ्यास करण्यापेक्षाही मित्रमैत्रिणींना भेटणं, त्यांच्याबरोबर धम्माल करणं अशी विचारात ही चिमुकली आहेत. कोरोनाची लस आली असली तरीही जोपर्यंत लस मिळत नाही तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची मानसिकता होत नाहीये.
ऑलाईन सुरू झालेलं नवीन शैक्षणिक वर्ष याचं पद्धतीने संपुष्टात येणार अशी पालकांची धारणा होती. त्यामुळे काहींनी शाळेचे शुल्क भरण्याचे मागे ठेवून तातडीची गरज म्हणून पाल्यासाठी नवीन मोबाईल घेतला. शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पालकांमध्ये आर्थिक जुळवाजुळव करण्याची वेळ आणली आहे.
चौकट :
पालकांच्यामागे शुल्काच शुक्लकाष्ठ
गतवर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत होते. त्यामुळे शाळेत न जाता गतवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, जून महिन्यापासून बहुतांश शाळांनी नियमित ऑनलाईन वर्ग सुरू करून मर्यादित अभ्यासक्रम घेण्याचे शासनाचे धोरण अवलंबले. अनेकांनी गतवर्षीचे शैक्षणिक शुल्क भरून विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील प्रवेश निश्चित केला; पण शाळा नियमित सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांनाही त्यासाठी पाठवावं लागणार. तसं केलं तर शाळेची फी भरणेही सक्तीचे होणार अशी पालकांच्या मनात धास्ती आहे. परिणामी शाळा सुरू होण्यापेक्षा शुल्काच्या शुक्लकाष्ठची धास्ती पालकांनी घेतली आहे.
पालकांचे संमतीपत्र अनिवार्य
शाळा सुरू करताना यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक असणार आहे. संसर्गापासून बचावासाठी खबरदारी म्हणून सगळ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा नवीन आलेला स्ट्रेन चिमुकल्यांसाठी धोकादायक असल्याची चर्चा असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
कोट :
मार्च महिन्यापासून कोरोनाने आणलेल्या अरिष्टाने विद्यार्थ्यांपासून खूप लांब गेलो होतो. शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले, तर विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाने शाळांच्या भिंती सुखावतील आणि निर्जीव वास्तूही पुन्हा सचेतन होतील, असा विश्वास आहे. कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.
- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका
कोट
घरात बसून ऑनलाईन वर्गांचा मुलांना खरंच कंटाळा आला होता. शाळा सुरू झाल्यामुळे मुलं खूश होतील. ऑनलाईनमुळे जसा अभ्यासक्रम कमी झाला तसं शैक्षणिक शुल्कातही कपात होण्याबाबतची स्पष्टताही शासनाकडून मिळावी, अशी अपेक्षा आहे.
- तेजश्री कणसे-जाधव, पालक