मलकापूर : मलकापुरात इंच-इंच जागेला सोन्याचा भाव असल्यामुळे दिवसेंदिवस पार्किंग समस्या रौद्ररूप धारण करीत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसह उपमार्ग व ढेबेवाडी रस्ता वाहनानी ‘हायजॅक’ केला आहे. उपमार्ग व ढेबेवाडी रस्त्यावर दिवसभर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कऱ्हाड जवळील मलकापूर शहरात मूळ गावठाणासह ६५ कॉलन्यांचा ९ चौरस किलोमीटर परिसरात विस्तार वाढला आहे. महामार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाच्या दुतर्फा सुमारे दोन हजार व्यावसायिकांनी लहान-मोठे व्यवसाय थाटले आहेत. याशिवाय अपार्टमेंट आणि हजारो इमारती उभ्या राहिल्या आहेत. दिवसेंदिवस बांधकामांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. ही वाढलेली वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सुविधा मात्र अपुरी पडत आहे. मलकापुरात दिवसेंदिवस पार्किंग समस्या गंभीर बनत असून, पार्किंग झोन निर्माण करण्याची गरज आहे. तशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर गाडी घरात पाय... मलकापुरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी अगोदरच कमी आहे. बांधकाम करताना नाल्यापर्यंतच्या जागेचा वापर करण्यात आला आहे. भाडेकरूंसह मालकांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क करून थेट घरातच पाय टाकला जातो. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गैरसोयीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पोलीसदादा मेहरबान शिवछावा चौक ते कोल्हपूर नाका परिसरात उपमार्गावर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी नेहमीच गस्त घालत असतात. काही वेळेला क्रेनच्या साह्याने उड्डाणपुलाखालील वाहनांवर कारवाईही करण्यात येते. शिवछावा चौकात उभे राहून दुचाकींवर कारवाई करण्याची नित्याचीच बाब आहे. मात्र केवळ २५ फुटांवरील कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीच्या रांगेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे उपमार्गाकडेच्या व धनदांडग्यांच्या वाहनांवर पोलीस मेहरबान असल्याचे चित्र आहे.सुविधा असतानाही रस्त्यावर पार्किंगअनेक संस्थांच्या कॅम्पसमध्ये पार्किंगची स्वतंत्र सुविधा करण्यात आलेली आहे. त्या-त्या संस्थेत काम करणारे अनेक कर्मचारी शॉर्टकट रस्त्याचा वापर करण्यासाठी दुचाकीच्या रांगा दिवस दिवसभर रस्त्यावरच लावून आपली ड्यूटी बजावतात. रस्त्यावरील वाहतुकीच्या अडचणीकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. सोय असूनही इतरांची गैरसोय करण्यातच ते धन्यता मानतात. एका घरात चार-चार गाड्या...सध्या नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा बदलत असल्याचे चित्र आहे. घरात व्यक्ती किती त्यापेक्षा घरात गाड्या किती यावर प्रतिष्ठा समजण्याची प्रथाच पडली आहे. त्यामुळे सध्या एका घरात चार-चार वाहने उभी असतात. ही वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाही नसते.
मलकापुरात राजरोसपणे रस्त्यावरच पार्किंग !
By admin | Published: September 06, 2015 8:34 PM