सातारा : मोबाइलवर ऑनलाइन पार्टटाइम नोकरीचा मेसेज पाठवून वेगवेगळ्या टास्कवर रक्कम भरून घेत एकाला साडेपाच लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधिताने सातारा शहर पोलिस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी नागराजू शंकरराव पेरुवाला (रा. संगमनगर, सातारा. मूळ रा. तेलंगणा राज्य) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. ५ ते ७ मार्च दरम्यान हा प्रकार घडला आहे. नागराजू पेरुवाला हे घरी असताना त्यांच्या मोबाइलवर दुसऱ्या मोबाइलवरुन ऑनलाइन पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर अज्ञाताने मेसेज करून सांगितले की, तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार मोबदला मिळेल. हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम पेरुवाला यांना मिळाली. त्यानंतर अज्ञाताने असेच काही टास्क देऊन रक्कम भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे पेरुवाला यांनी रक्कम भरली. परंतु, त्यानंतर कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच अज्ञाताने प्राेसेसिंग अन् टॅक्सची रक्कम भरण्यासही सांगितले. अशाप्रकारे ५ लाख ५४ हजार रुपये इतकी रक्कम भरून घेत पेरुवाला यांची फसवणूक करण्यात आली.या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे अधिक तपास करत आहेत.
पार्टटाइम नोकरीचा मेसेज; साताऱ्यातील एकास ऑनलाइन साडेपाच लाखांचा गंडा
By नितीन काळेल | Published: March 29, 2023 3:38 PM