म्हसवड : सातारा जिल्हा हळूहळू अनलॉक होऊ लागला असताना म्हसवड शहर मात्र पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त नागरिक व व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता पालिका कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत लॉकडाऊन मागे घेतला जात नाही, तोवर आंदोलन स्थगित न करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस अंशत: अनलॉक करण्याचे जाहीर केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आला. त्यामुळे जिल्हा जवळपास दीड महिन्यांपासून पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. ७ जूनपासून जिल्ह्यातील लॉकडाऊन अंशत: शिथिल करतानाच अत्यावश्यक सेवा सुरु करण्यास परवानगी दिली. असे असताना माण- खटावच्या प्रांताधिकाऱ्यांनी म्हसवड शहर हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करीत ते पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली.
वास्तविक जिल्हा लॉकडाऊन होण्यापूर्वी १५ दिवस अगोदरच म्हसवड शहर हे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते. शहर बंदला जवळपास दोन महिने उलटून गेले. त्यामुळे शहरातील सर्व अर्थकारण कोलमडले असून, सर्वसामान्य वर्गाचे हाल सुरु आहेत. अशात प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखाली लॉकडाऊन कायम ठेवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात म्हसवडमधील व्यापारी, नागरिक व आम्ही म्हसवडकर टीमच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंगळवार, दि. ८ रोजी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनामुळे प्रशासन गोंधळून गेले. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘जोवर निर्णय नाही तोवर माघार नाही’ असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. यानंतर मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्यासमोर नागरिक व व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पालिका प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन काही अंशी उठवत शहरात मंगळवार, गुरुवार व शुक्रवार असे ३ दिवस अनलॉक करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आला. यानंतर आंदोलकांकडून आंदोलन स्थगित करण्यात आले.
(चौकट)
तीन दिवस हे सुरू राहणार..
अनलॉक दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत बँका व भाजीमंडई सुरु राहील, तर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत फक्त किराणा मालाची दुकाने सुरू राहतील. शनिवार व रविवार शहर पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी दिला.
(चौकट)
मंडई, किराणासाठी एकच वेळ ठरवावी
पालिका मुख्याधिकाऱ्यांनी भाजी मंडई व किराणासाठी वेगवेगळी वेळ ठरवून दिल्याने शहरात दिवसभर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने सकाळी ९ ते दुपारी १२ अशी एकच वेळ भाजी मंडई व किराणासाठी द्यावी, यानंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही म्हसवडकर टीमने निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे.
फोटो : ०८ म्हसवड
शहरातील लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात मंगळवारी म्हसवड येथील व्यापारी, नागरी व आम्ही म्हसवडकर टीमच्या सदस्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. (छाया : सचिन मंगरुळे)
===Photopath===
080621\img_20210608_104653.jpg
===Caption===
म्हसवडकरांच्या आंदोलनानंतर शहरात काही अंशी अनलॉक