कराड : महसूल विभागाच्या पुढाकाराने शासनाच्या निर्णयानुसार यापुढे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातील पिकांची तसेच कायम पडिक क्षेत्राची माहिती ई-पीक ॲपच्या माध्यमातून तलाठ्यांना पाठवायची आहे. त्यानुसार गाव नमुना बारामधील त्याची नोंदणी केली जाईल. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कऱ्हाडचे प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कऱ्हाड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सर्व हंगामातील पिकांची माहिती ई-पीक ॲपवर अद्यावत करणे आवश्यक आहे. शासनाच्या ३० जुलैरोजीच्या परिपत्रकांमध्ये तसे नमूद करण्यात आले आहे. यासाठी १४ सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत असून, शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे.
ही माहिती मुदतीत न भरल्यास शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो. तुमचे शेत पडिक दाखवले जाईल,पेरणी झालीच नाही, असे दर्शवले जाईल. परिणामी पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून पीक कर्ज मिळवताना अडचणी येतील, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, शासनाद्वारे एखाद्या पिकाला मदत जाहीर केली, तर ती मदत मिळणार नाही, जंगली श्वापदांकडून पिकांचे नुकसान झाले तरी नुकसानभरपाई मिळणार नाही. तरी शेतकऱ्यांनी याचा विचार करून त्वरित पीक ॲपवर माहिती भरून सहकार्य करावे, असेही म्हटले आहे.