वडूज : नगरपंचायतीच्या पहिल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले असून यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. समोरासमोर लढतीत बहुतांशी प्रभागात सहा पेक्षा अधिक अर्ज दाखल आहेत. प्रत्येक उमेदवाराला आपणच नगरसेवक व्हावे, अशी प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळाली तरी ठिक अन्यथा अपक्ष म्हणून फडात राहणारच, अशी उर्मी मनात ठेवून प्रत्येक उमेदवार प्रचारात दंग आहेत. त्यामुळे नेत्यांवरील निष्ठा, पक्षनिष्ठा, राजकारणातील तत्त्वांना बगलफाटा देत प्रत्येकाने सोईचे राजकारण केले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षातर्फेअनेक अपक्षांना ही ए. बी. फॉर्म दिल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपले पक्ष बदलून अपक्ष ही अर्ज ठेवले आहेत. या अचानक झालेल्या घडामोडींमुळे व पक्षाच्या ए. बी. फॉर्ममुळे उमेदवार सध्यातरी तळ्यात मळ्यात आहेत. काही ठिकाणी कोणताच पक्ष नको अशा स्वरूपाच्या नाट्यमय घडामोडी झाल्याने काहींचे अर्ज अपक्ष म्हणूनच दाखल झाले आहेत. तर नेत्यांच्या अचानक झालेल्या पक्ष प्रवेशामुळे ऐनवेळी पक्ष बदल ही झाले आहेत. काही प्रभागांत पक्षापेक्षा ज्येष्ठ नेत्यांच्या व्यक्तीनिष्ठ राजकारणाला प्राधान्य दिल्याने अपक्ष अर्ज ठेवणेच हिताचे अशा पद्धतीचे राजकारण सध्या वडूज नगरीत पाहावयास मिळत आहे. अपक्षांना पक्षाचे ए. बी. फॉर्म देऊन काही पक्षांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला असल्यासारखी परिस्थिती झाली आहे. एकाच प्रभागात दोन उमेदवारांना पक्षाचे ए. बी. फॉर्र्म दिल्याने आता अर्ज कोणाचा काढायचा यासाठी ‘डोक्याला हात लावून’ बसलेली नेतेमंडळी पाहावयास मिळत आहेत. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ऐनवेळी भाजपची उमेदवारी घेण्यात धन्यता मानणारे उमेदवार ही मतदार संघात चाचपणी करताना आढळत आहेत. काही ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी निश्चित असताना अचानक राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अर्ज दाखल झाल्याने काँग्रेसच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वत: नेत्यांनाच रिंगणात उतरावे लागणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सेवानिवृत्त होईपर्यंत भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनीही ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी केल्याने सर्वच पक्षांची खिचडी झाली आहे. या सर्व प्रकारामुळे वडूजचे राजकारण घडतंय-बिघडतंय असेच म्हणावे लागेल. पहिला ‘नगरसेवक ’ होण्यासाठी अतिउत्साही उमेदवारांची पक्षाच्या अंतर्गत खेळीमुळे फार मोठी राजकीय गोची झाली आहे. हे सर्व प्रकार मतदारराजा नजरेत साठवत असून, अशा उमेदवारांना राजकीय प्रसंगी राजकीय गुदगुल्याही करत आहेत. रणांगणात उतरलेल्या उमेदवारांची आता माघार नाही, याच ब्रीद वाक्याला सामोरे जात राजकीय लढाई लढणे क्रमप्राप्त आहे. उमेदवारांची महाभातातील ‘अभिमन्यू’ सारखी अवस्था झाल्याने हार नाही तर जीत हीच मानसिकता झाली आहे. पक्षाच्या तिकिटावर की अपक्ष उमेदवारी या मन:स्थितीत ‘हसावे की रडावे’ अशी अवस्था काही उमेदवारांची झाली आहे. एकूण काम नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळविण्यासाठी राजकारणात ‘कायपण’ असे म्हणून स्वत:चीच समजूत काढत उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)
पक्षाच्या ए. बी. फॉर्ममुळे उमेदवार तळ्यात-मळ्यात
By admin | Published: November 02, 2016 11:09 PM