पुसेगाव : येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवजयंतीनिमित्त उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा नियमबाह्य असल्याचे सांगत पोलीस व महसूल प्रशासनाने पुतळा काढण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले. या घटनेनंतर संतप्त शिवप्रेमींनी प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करीत शनिवारी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. दरम्यान, ‘अतिक्रमण काढतेवेळी लोकांच्या गरजेचे असलेले चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृह का पाडले? लोकोपयोगी स्वच्छतागृह प्रशासन नियमबाह्यरीत्या पाडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा आमचा नियमबाह्य निर्णय का चालत नाही?,’असा सवालही यावेळी करण्यात आला. पुसेगाव ग्रामस्थांच्यावतीने पुकारलेल्या या आंदोलनाला व्यापारी मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुख्य बाजारपेठेसह गावातील सर्व दुकाने बंद ठेवली. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार विवेक साळुंखे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तहसीलदार साळुंखे यांनी व्यापाऱ्यांना आपापल्या इमारतीत स्वच्छतागृह बांधण्याचा सल्ला दिला. ‘जे व्यापारी नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्या इमारतीची नोंद ग्रामपंचायतीत करू नये,’ असे बजावले. मात्र, ‘यापूर्वी झालेल्या इमारतीत स्वच्छतागृहाची सोय नसताना देखील ग्रामपंचायतीने त्या इमारतींची नोंद कशी काय केली?’ असा प्रश्न विचारला. अखेर लोकांच्या अतिक्रमणांचा प्रश्न चर्चेतून सोडवण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पुसेगावात बैठक घेणार असल्याचे सांगितले गेले. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवरायांचा पुतळा हलविण्यावरून पुसेगाव बंद
By admin | Published: February 21, 2016 12:56 AM