सातारा : सातारा बसस्थानकात बस थांबल्यानंतर जेवणासाठी बाहेर आलेल्या प्रवाशाला मारहाण करुन सोन्याचे दागिने, रोख रकमेसह साडे तीन लाखांच्या एेवजावर डल्ला मारणाऱ्या तिघांच्या शाहूपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हे तिघेही सातारा शहरातील असून अवघ्या सहा तासांत त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांत तक्रार दिलेले सिकंदर जगन्नाथ पवार (रा. इस्लामपूर, जि. सांगली) हे दि. ६ जुलै रोजी मुंबई ते इस्लमापूर असा प्रवास बसने करत होते. रात्रीच्या सुमारास बस सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. यावेळी बस जेवणासाठी काहीवेळ थांबविण्यात आली. त्यामुळे सिकंदर पवार हे बसस्थानकाच्या बाहेर जेवणासाठी आले. यादरम्यान, अज्ञातांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची सोनसाखळी, अंगठी, मोबाईल आणि खिशातील रोख रक्कम नेली. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला होता.त्यानंतर पथकाने माहिती घेत तक्रादाराला चायनीजच्या दुकानावर दोन संशियतांनी मारहाण करुन एेवज लंपास केल्याची माहिती मिळाली. त्यातच चायनीज दुकान मालकाने हा प्रकार पाहिल्याने त्याने याबाबत अधिक माहिती दिली. त्यानंतर पथकाने रफिक युसूफ मुलाणी (वय ३१, रा. पुष्कार मंगल कार्यालयासमोर भोसले चाळ, सातारा), आकाश सुधीर इंगवले (वय २१, रा. मेहर देशमुख काॅलनी, करंजे पेठ सातारा) आणि ओयस आयाज खान (वय २७, रा. बुधवार पेठ, सातारा) या तिघांना जेरबंद केले.या कारवाईत पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, सहायक पोलिस फाैजदार ए. ए. बागवान, हवालदार सुरेश घोडके, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमीत मोरे आदींनी सहभाग घेतला.
दुचाकीसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत...सातारा बसस्थानबाहेर ही घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हलविली. त्यातच चायनीज दुकान मालकाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या सहा तासांतच संबंधितांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरीतील सोनसाखळी, अंगठी, मोबाइल, रोखड असा एेकूण ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.