नागठाणे : अतित, ता. सातारा येथे कोरोनासोबत आता डेंग्यूसदृश साथीचाही शिरकाव झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
याबाबत माहिती अशी की, नागठाणे परिसरातील अतित येथे काही दिवसांपासून कोरोनाच्या सोबतच डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. सुरुवातीला हे प्रमाण अत्यल्प आहे, असे वाटत असताना डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समजते आहे. कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना आता डेंग्यूच्या साथीमुळे त्रस्त केले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. डेंग्यू या आजाराची लक्षणे ही सर्दी, ताप, खोकला याच प्रकारची आहे.
गावातील बऱ्याच व्यक्ती या आजाराने त्रस्त आहेत. नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत अतित आणि समर्थगाव अखत्यारित एक आरोग्य उपकेंद्र उपलब्ध आहे. तसेच पूर्णवेळ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नियुक्ती असले तरी सध्या त्यांना सातारा येथील कोरोना सेंटरमध्येही कामासाठी बोलविले जात असल्याने गावामध्ये पूर्ण वेळ देता येत नाही. त्यामुळे या अडचणीच्या काळात आरोग्य विभागाने येथील उपकेंद्रामध्ये किमान आरोग्य कर्मचारी तरी पूर्ण वेळ द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर अतित ग्रामपंचायतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळावी, तसेच घराशेजारी सांडपाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे. काही लक्षणे जाणवल्यास त्वरित नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन सरपंच तानाजी जाधव यांनी केले आहे.